अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कुणी नेता असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पत्नीला तिकीट मिळणार नाही. जर त्यांनी ५१ टक्के मतांची हमी दिली तरच पक्ष त्यांना तिकीट देईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीपूर्वी स्पष्टपणे जाहीर केले, पण अखेरीस जिल्ह्यात अनेक नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी बहाल करण्याची वेळ भाजपवर आली.
अमरावती जिल्ह्यात दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे. बहुतांश ठिकाणी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत असल्याने चूरस निर्माण झाली आहे. त्यातच काही स्थानिक आमदारांनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानल्याने इतर इच्छूक उमेदवारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्याचे बंडखोरीत रुपांतर होण्याची शक्यता आहे. आमदारकी मिळवल्यानंतर नगराध्यक्षपदही घरातच येणार की मतदार त्यांना धक्का देणार, हे येत्या ३ डिसेंबर रोजी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड हे नऊ वर्षांपुर्वी धामणगावचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर ते आमदार झाले. आता नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या भगिनी अर्चना रोठे-अडसड या उमेदवार आहेत. याआधी १९८५ ते १९९० पर्यंत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अरूण अडसड यांनी धामणगावचे नगराध्यक्षपद भुषवले आहे. अडसड कुटुंबामधील नगराध्यक्षपद सांभाळण्याची परंपरा यावेळीही कायम राहणार की, मतदार वेगळा कौल देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दर्यापूर नगरपालिकेत भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत देखील त्या निवडून आल्या होत्या. यावेळी नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून अनेक जण इच्छूक होते, पण प्रकाश भारसाकळे यांनी आपल्या प्रभावाचा वापर केल्याचे चित्र दिसून आले.
दर्यापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांनी त्यांचे पुत्र यश लवटे यांच्यासाठी अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदाची उमेदवारी खेचून आणली आहे. दुसरीकडे, चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी नगरसेवकपदासाठी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपतर्फे आल्हाद कलोती हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. चिखलदरा येथील पक्षांतर्गत बैठकीत त्यांचे नाव देखील पुढे आले होते, पण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्रसिंह सोमवंशी यांना भाजपमध्ये आणून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली.
