अमरावती : महायुतीत भाजपसोबत आमचा ताळमेळ होऊ शकतो, पण भाजपसोबत जो पक्ष आहे, त्यांच्यासोबत आम्ही राहू शकत नाही. त्यामुळे युती व्हायचा प्रश्नच येत नाही, असे परखड मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी व्यक्त करत युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर निशाना साधला आहे.
आगामी अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाशी युतीचा वरच्या स्तरावर निर्णय जरी झाला, तरी अमरावतीत राणा यांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार. त्यांच्यासोबत आमचा ताळमेळ बसूच शकत नाही, असे संजय खोडके म्हणाले.
ज्या लोकांसोबत आम्ही सातत्याने संघर्ष करीत आलो, ज्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होईल, त्यांच्यासोबत युती करणे योग्य होणार नाही, आम्हाला सर्वसामान्यांना, सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालायचे आहे. रोज एका धर्मावर टीका करणाऱ्या लोकांसोबत आम्ही एकत्र राहू शकत नाही. एका धर्माला लक्ष्य करून द्वेषाचे राजकारण करणाऱ्या लोकांसोबत आम्ही युती करू शकणार नाही, असे स्पष्ट करताना संजय खोडके यांनी राणा दाम्पत्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
भाजपशी संबंधित इतर घटक संघटना या जाती आणि धर्मात द्वेष निर्माण करणाऱ्या असल्या तरी भाजप सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. अमरावतीत भाजपाचे इतर मित्र हे दोन धर्मात तेढ निर्माण करणारे आहेत, अशी टीका संजय खोडके केली.
भाजपच्या वतीने महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याबाबत बोलले जात असताना आमचे नेते अजित पवार यांनीही काल परवा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्यास सज्ज आहोत असे जाहीर केले आहे. राज्यात सत्तेवर असणाऱ्या महायुतीतील तीनही पक्ष जर महापालिका निवडणुकीत एकत्र येत असतील तर अमरावतीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आमच्यासोबत अजिबात चालणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असे देखील संजय खोडके यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या शहराध्यक्षांच्या पदग्रहण समारंभात भाजप कुठल्याही पक्षासोबत युती करणार नाही, स्वबळावर लढणार, अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. संजय खोडके आणि रवी राणा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे.