अमरावती : शहराच्या वाहतुकीचा कणा असलेला राजकमल चौक रेल्वे उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहचल्याने या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक रविवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. त्यामुळे इर्विन चौक ते राजापेठ या रस्त्यावर सोमवारी अभूतपूर्व वाहनाकोंडी झाल्याने अमरावतीकरांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागले.
सोमवारी दुपारी इर्विन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक आणि राजकमल चौक या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले. वाहतूक पोलीस मूकदर्शक बनले. या मार्गावर दोन रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या होत्या, बरेच परिश्रम घेऊन त्यांना वाट मोकळी करून देण्यात आली.
राजकमल आणि जयस्तंभ या दोन चौकांना रेल्वे स्थानक तसेच हमालपुरा या दोन मार्गांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम १९६३ मध्ये करण्यात आले होते. हा पूल धोकादायक स्थितीत पोहोचल्याने या पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुमारे महिनाभरापुर्वी बंद करण्यात आली होती. पण, काल अचानक प्रशासनाने या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. पादचाऱ्यांनाही या पुलावरून ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या उड्डाणपुलाच्या संरचनात्मक लेखापरीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) काम हाती घेण्यात आले. अस्तित्वातील या पुलाच्या स्टिल गडर्सला जंग लागलेला आहे. तसेच डेक स्लॅबमध्ये अनेक ठिकाणी भेगा, डेक स्लॅबमध्ये गळती आणि स्टील गर्डर्सना आधार देणाऱ्या अब्टमेंटमध्ये गळती या सारख्या मोठ्या संरचनात्मक अडचणी आढळून आल्या आहेत. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांना पत्र दिले. या पत्रामध्ये रेल्वे उड्डाणपुलाच्या कमकुवत घटकावरील ताण कमी करण्यासाठी पूल फक्त हा हलक्या वाहतुकीसाठी खुला करुन वाहतूक मर्यादीत ठेवावी. जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावी, असे सूचवण्यात आले होते, पण आता महिनाभरानंतर सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.
वाहतूक बंद करण्याआधी पर्यायी मार्गाची सूचना न देण्यात आल्याने सोमवारी आपल्या दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या तीन प्रमुख पुलांपैकी एक पूल आता बंद झाल्याने राजापेठ ते इर्विन चौक उड्डाणपूल आणि राजापेठ येथील रेल्वे उड्डाणपूल हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे अचानकपणे या मार्गावर वाहतुकीचा ताण निर्माण झाला आणि अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली.