अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ शनिवारी २४ जून रोजी सकाळी ११ वाजता कठोरा मार्गावरील पी.आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्‍या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियममध्‍ये आयोजित करण्‍यात आला आहे. या समारंभाच्‍या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्‍हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर उपस्थित राहणार आहेत.

या दीक्षांत समारंभामध्ये ४६ हजार १४४ विद्यार्थ्‍यांना पदवी व २३६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. त्‍यात मानव विज्ञान विद्याशाखेच्‍या ११ हजार ६५, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्‍या ९ हजार ४५४, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्‍या १९ हजार २३१ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा ४ हजार ७९६ या व्यतिरिक्त स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या ४७९ व स्वायत्त शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या (एच.व्ही.पी.एम.) १ हजार ११९ विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना ११९ सुवर्णपदके, २३ रौप्यपदके व २५ रोख पारितोषिके असे एकूण १६७ पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघातापाठोपाठ आता इंधन चोरीचे सत्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलींमध्ये सर्वाधिक सुवर्ण अकोल्‍याच्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी मल्हारा गौरी प्रशांत हिला ६ सुवर्ण,१ रौप्य व १ रोख पारितोषिक, तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची चांदनी नुराली शहा या विद्यार्थिनीला ६ सुवर्ण व १ रोख पारितोषिक १ घोषित झाले आहे. मुलांमध्ये यवतमाळच्‍या जगदंबा अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचा आशुतोष किसन राठोड या विद्यार्थ्याला सर्वाधिक ५ सुवर्ण घोषित झाले आहेत. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय २४९ संशोधकांना आचार्य पदवी देवून सम्मानित करण्यात येत आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरीता विद्यार्थ्‍यांना व्ही.एम.व्ही. जवळील कठोरा नाका ते पी.आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप (कार्यक्रमस्थळी) पर्यंत येण्यासाठी व जाण्यासाठी विनामूल्य तीन बसेसची व्यवस्था २४ जून रोजी करण्यात आली आहे, अशी माहिती कुलगुरूंनी दिली.