अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण आज मुंबईत जाहीर झाले. यात आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांची संधी हुकली असून सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी अध्यक्षपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

अमरावती जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सुमन सरोदे यांनी १९९४ ते ९५ पर्यंत प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळले होते. जिल्हा परिषदेच्या १९६२ ते मार्च २०२२ पर्यतच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ३१ अध्यक्ष जिल्हा परिषदेला मिळाले. यापैकी पाच महिलांनी सलग सहावेळा अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे.

यात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सुमन सरोदे यांना मान मिळाला होता. त्यानंतर १९९७-९८ मध्ये उषा बेठेकर, १९९९ ते २००० मध्ये विद्या वाटाणे, सन २००० ते २००२ पर्यत सुरेखा ठाकरे, २००५ ते २००७ पर्यत उषा उताणे आणि २०१२ ते २०१४ या कालावधीत सुरेखा ठाकरे आदीनी अध्यक्ष पद भुषविले आहे. यात सुरेखा ठाकरे यांना दोनदा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या अध्यक्षपदासाठी आज मुंबईत आरक्षण जाहीर झाले. याकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. अमरावती जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील कोणती महिला अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार? याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र त्याच वेळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिलांना निवडून येण्याची संधी मिळत आहे.

त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिला सदस्यांची संख्या आपोआपच वाढली आहे. पर्यायाने अध्यक्षपदासाठी महिलांमध्ये यावेळी रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेत गेल्या वेळी काँग्रेसची सत्ता होती. आगामी निवडणुकीसाठी कोणते पक्ष एकत्र येतात आणि कुणाला किती यश मिळते यावर पुढील अध्यक्षपदी कोण महिला विराजमान होणार हे अवलंबून असणार आहे. गेल्यावेळी भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता मिळाली नाही, हे शल्य जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना अजूनही आहे.

अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, महापालिका आयुक्त सौम्या चांडक-शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे.