नागपूर : करोनाच्या प्रभावातून जग सावरला असताना आता नवा एचएमपीव्ही विषाणूचा धोका जगासमोर आहे. देशात या विषाणूचे प्रकरण बघायला मिळत आहे. राज्यात या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करत राज्याच्या आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापित करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला.

विशेष कृती दल स्थापित करा

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर २०२० मध्ये उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. करोनाबाबत अप्रभावी व्यवस्थापनामुळे न्यायालयाने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला वारंवार आदेश दिले होते. आता याच जनहित याचिकेत वेगाने पसरणाऱ्या नव्या एचएमपीव्ही विषाणूबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. नव्या विषाणूचे लक्षण अगदी करोना विषाणूसारखे आहे. त्यामुळे राज्यात परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती अर्जाच्या माध्यमातून न्यायालयीन मित्र ॲड.श्रीरंग भांडारकर यांनी केली आहे. नव्या विषाणूच्या रुग्णांची चाचणी करणे, लक्षणांबाबत तसेच प्रतिबंधात्मक उपायांबाबत सार्वजनिक जनजागृती अभियान राबविणे, राज्यात आरोग्य व्यवस्थेला नव्या विषाणूला हाताळण्यासाठी सज्ज करणे आदी मागण्या अर्जाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तात्काळ विशेष कृती दलाची स्थापना करून न्यायालयाला नियमित अहवाल द्यावा, अशी मागणीही अर्जातून केली गेली आहे. याचिकेवर बुधवार, ८ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागाकडून सर्व्हेक्षण

चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचे पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे. एचएमपीव्हीचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. राज्यात २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये श्वसन संसर्गात कोणतीही वाढ झालेली दिसून आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी श्वसनविकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही साथरोगाचा संसर्ग सुरू असून, त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी-खोकला रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करावे, असे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत.