अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, डायलिसीसही सुरू होणार

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर :  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आता कॅथलॅब व डायलेसीस यंत्र बसवण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नववर्षांत येथे हृदयरुग्णांना अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टीसह मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना डायलेसीसचीही सुविधा मिळणार आहे.

मध्य भारतातील शासकीय रुग्णालयांपैकी केवळ सुपरस्पेशालिटी या एकाच शासकीय रुग्णालयात हृदय आणि मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंतीच्या प्रक्रिया करण्याची सुविधा आहे. त्यामुळे  अनेकांना उपचारासाठी ताटकळत रहावे लागते. परंतु आता मिहान परिसरात सुरू झालेल्या ‘एम्स’ रुग्णालयात गेल्या महिन्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सागर माकोडे आणि इतर एक तर मूत्रपिंड विभागात डॉ. आनंद चेलाप्पन रुजू झाले आहेत. त्यामुळे येथे कॅथलॅब आणि २ डायलेसिस यंत्र बसवण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे. सोबत दोन्ही विभागाच्या बाह्य़रुग्णसेवाही सुरू झाली आहे. सोबतच येथे श्वसनरोग विभागाचे डॉ. सत्यजीत शाहू रुजू झाल्याने या विभागाचीही बाह्य़रुग्ण  सेवा सुरू झाली आहे. सध्या एम्समध्ये कोविड रुग्णांसाठी ८० खाटा आणि इतर आजाराच्या रुग्णांसाठी १२ खाटा उपलब्ध आहेत.

नवीन वर्षांत सुमारे ३०० खाटा वाढणार

एम्समध्ये जुलै-२०२१ पर्यंत रुग्णालयाशी संबंधित बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे येथे इतर आजाराच्या रुग्णांसाठी सुमारे ३०० खाटा आणखी उपलब्ध होणार आहेत. त्यातील २५ ते ३० खाटा पेईंग वार्डातील असतील. या खाटा वाढल्यावर येथे अत्यवस्थ रुग्णही घेतले जातील.

एम्समध्ये हृदय, मूत्रपिंड विभागाचे तज्ज्ञ  रुजू झाले असून कॅथलॅब व डायलेसीस यंत्रही बसवण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नवीन वर्षांत येथे गरीब रुग्णांना मोफत व इतरांना अत्यल्प दरात अ‍ॅन्जिओग्राफी व अ‍ॅन्जिओप्लास्टीसह डायलेसीसची सुविधा  उपलब्ध होईल.’’

– मेजर जनरल डॉ. विभा दत्ता , संचालक, एम्स