घटस्फोटाच्या खटल्यातील संतप्त पक्षकाराचे कृत्य
घटस्फोटाच्या खटल्यातील संतप्त पक्षकाराने आज कौटुंबिक न्यायालयात तोडफोड करून न्यायपीठाच्या दिशेने खुर्ची भिरकावली. तेथे न्यायाधीश नसल्याने केवळ पीठावरील काचा फुटल्या. मात्र, हा प्रकार अतिशय गंभीर होता. काही वेळाकरिता न्यायालय परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते.
श्रीकृष्ण सुंदरलाल श्रीवास (३५) रा. मॉडेल मिल चाळ, गणेशपेठ असे आरोपीचे नाव असून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. गेल्या २०१५ पासून त्याची पत्नी वेगळी राहते. तेव्हापासून तो मानसिक तणावात असून त्याने घटस्फोटाकरिता कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत त्याने चार वकील बदलले आहे, तर त्याच्या पत्नीची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने न्यायालयाने तिला वकील पुरवला आहे. त्यामुळे तो न्यायालयावर चिडून होता. त्यांच्या घटस्फोट याचिकेवर न्या. पलक जामदार यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरू असताना तो वारंवार न्यायाधीशांना भेटण्याची विनंती करीत होता.
मात्र, कोर्टातील कर्मचाऱ्यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे तो सुयोग इमारतीच्या खाली उतरला व दुपारी १.३० वाजता त्याने आपला हेल्मेट जमिनीवर आदळून राग व्यक्त केला. त्यानंतर सुरक्षेतील पोलीस कर्मचाऱ्यांना काहीही समजायच्या आधी तो पुन्हा पहिल्या माळ्यावर चढला. तेथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाच्या कार्यालयासमोरून एक खुर्ची खाली जमिनीवर फेकली. त्यानंतर न्या. जामदार यांच्या न्यायालयात शिरला व प्लास्टिकची खुर्ची न्यायपीठाच्या दिशेने भिरकावली. त्यावेळी न्या. जामदार या बाजूलाच लागून असलेल्या खासगी कक्षात बसून होत्या.
खुर्ची फेकण्यामुळे न्यायपीठावरील काच फुटली व न्यायाधीशांची खुर्चीही पडली. आवाज झाल्याने न्यायाधीशांसह सर्व कर्मचारी गोळा झाले. श्रीकृष्णला ताबडतोब पकडून सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे सर्व न्यायालयात एकच खळबळ उडाली होती.