दोन पोलीस उपनिरीक्षकासह चौघे एसबीच्या जाळ्यात; उपनिरीक्षकाचा गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न विफल
सक्रांतीचा सण अगदी सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण त्यापूर्वीच नागपुरातील भ्रष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर संक्रांत आली आहे. पाचपावली आणि नंदनवन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षकासह चौघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. त्यापैकी एका पोलीस उपनिरीक्षकाने गोळी झाडून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीचे अधिकारी आणि त्याच्या पत्नीमुळे तो बचावला आणि गोळी छताला लागली. दिवसभराच्या घटनाक्रमाने नागपूर पोलीस हादरले.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पहिला रेल्वे फाटक परिसरात रॉयल दिवटे सावजी भोजनालय आहे. या भोजनालयाचा मालक कुख्यात दारू विक्रेता आशीष पांडुरंग दिवटे (२५) याच्या मालकीचे आहे.
आशीष हा पूर्वीचा अवैध दारू विक्रेता असून त्याच्याविरूद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात २००४ पासून आतापर्यंत एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या हॉटेलमध्ये अवैधपणे दारू विक्री करण्यात येत असल्याची धमकी देऊन पोलीस उपनिरीक्षक मनीष गावंडे (३०), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उल्हास पवार (५१) यांनी दरमहिना ४ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. यादरम्यान त्यांचे अनेकदा बोलणे झाले आणि त्यांनी पोलीस शिपाई प्रवीण जांभुळकर (३२) याच्यामार्फत पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
याची तक्रार दिवटे याने ऑक्टोबर महिन्यात एसीबी कार्यालयात केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहानिशा केली. त्यावेळी तिन्ही आरोपींच्या भ्रमणध्वनी संभाषणावरून त्यांनी पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. परंतु त्यानंतर त्यांनी पैसे स्वीकारले नाही. त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पुराव्यांच्या आधारे आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या नजिकच्या शासकीय निवासस्थानी गावंडेला अटक करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी गावंडेची पत्नीही घरात होती.
गावंडेचे मे-२०१५ मध्ये लग्न झाले असून पत्नी गर्भवती आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत घरातून बाहेर पडण्यापूर्वी तो पत्नीसोबत बोलण्याचे कारण सांगून आतमधील खोलीत गेला.
त्यावेळी त्याने पोलीस कपाटातील सरकारी बंदूक काढून स्वत:च्या डोक्यावर रोखली. यावेळी त्याच्या पत्नीने नवऱ्याचा हात पकडून झटापट केली आणि किंचाळली. त्यावेळी एसीबीचे अधिकारीही खोलीत पोहोचले असता त्यांना हा सर्व प्रकार दिसला. त्यांनी ताबडतोब गावंडे याचा हात पकडून अडवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत गावंडे आणि एसीबीचे अधिकारी पलंगावर पडले आणि बंदुकीतून गोळी सुटली. सुदैवाने ही गोळी कुणालाही न लागता घराच्या छताला लागली. हा प्रकार समोर येताच उल्हास पवार आणि प्रवीण जांभुळकर हे फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन, पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.
दुसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. नंदनवन पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक राजेश्वर राऊतला (५२) एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ११ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
महापालिकेचे कंत्राटदार बावणे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली. बावणेकडे एक मुलगी कंत्राटी तत्त्वावर कामाला होती. त्या मुलीने महिनाभरापूर्वी आत्महत्या केली.
त्या मुलीने बावणे याच्या छळामुळे आत्महत्या केली, अशी धमकी देऊन उपनिरीक्षक राऊत हा बावणे याला धमकावत होता. मुलीच्या आत्महत्येच्या प्रकरणात आरोपी न बनविण्यासाठी २० हजारांची लाच मागितली.
बावणे यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीनंतर शहानिशा करून दुपारी १.३० वाजता पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका स्वीटमार्टमध्ये पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले. पहिली कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख आणि त्यांच्या चमूंनी केली. तर दुसरी कारवाई ही पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी यांच्या पथकाने केल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले. याप्रकरणी विशेष पथकाकडून कसून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती या वेळी अधिकृत सूत्रांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
पवार ‘वसुली मॅन’
पाचपावली पोलीस ठाण्यातील कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उल्हास पवार याचेही नाव आरोपींमध्ये आहे. उल्हास पवार हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा लेखनिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो लेखनिकाचेच काम करीत आहे. पोलीस निरीक्षकांचे लेखनिक बनून तो अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून वसुलीचे काम करतो. पोलीस विभागातील ‘वसुली मॅन’ अशी त्याची प्रतिमा विभागात आहे, अशी माहिती अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली.
पोलीस निरीक्षकांवरही संशयाची सुई
पोलीस उपनिरीक्षक राजेश्वर राऊत लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक एस. पी. नंदनवार यांचाही सहभाग असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. परंतु एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अद्यापतरी नंदनवार यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याचे स्पष्ट केले.