अमरावती : यंदा पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्याठिकाणी सफरचंद, डाळिंबासारख्या फळांना बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. त्यातच महाराष्ट्रात या फळांची आवक वाढली. मात्र त्याचा फटका अमरावती जिल्ह्यातील केळींना बसत आहे. केळीचे कमाल दर हे सध्या १६०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आले आहेत.
केळी लागवड खानदेशात सर्वाधिक असली, तरी विदर्भात अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून केळीची लागवड केली जाते. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पथ्रोट ,पांढरी खानापूर, सातेगाव, वडाळी देशमुख, रुईखेड, पणज या गावांमध्ये केळीचे उत्पादन हे गेल्या शंभर वर्षांपासून घेतले जात आहे.
पथ्रोट आणि अंजनगाव सुर्जी परिसरात केळी पिकवण्याचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. सातपुडा पर्वतरांगेत अचलपूर पासून थेट बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद या भागात देखील अनेक वर्षांपासून चांगल्या दर्जाच्या केळीचे उत्पादन घेतले जाते. केळी उत्पादनासाठी पूर्वी बेना अर्थात कंद वापरले जायचे. हा कालावधी साधारण १८ महिन्याचा होता. मात्र आता उती संवर्धित अर्थात टिशू कल्चरचे रोप वापरले जाते. यामुळे घड तयार होण्याचा कालावधी देखील कमी झाला. काही वाणाच्या वृक्षाला अकराव्या महिन्यातच केळीचे घड पूर्णतः तयार होतात, अशी माहिती केळी उत्पादकांनी दिली.
केळीच्या दरात घसरण
केळीचे दर जुलैच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी होते. कमाल दरपातळी ही २१०० रुपये प्रतिक्विंटल अशी होती. पण, गेल्या काही दिवसांत केळी दरात सतत घसरण झाली. किमान दर हे ६०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत आहेत.
उत्तरेकडील काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सफरचंद त्या राज्यांमध्ये पोहचू शकले नाहीत. राज्यात सफरचंदाची आवक वाढली आणि सिमला सफरचंदाचे दर ६ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे केळीची मागणी कमी झाली.
किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलो या दराने विकले जाणारे सफरचंद हे ६० रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे. डाळिंबाचे दर देखील कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल या फळांच्या खरेदीकडे वळला आहे.
मागील वर्षी गणेशोत्सव ते नवरात्रोत्सवाच्या कालावधीत केळीचे दर टिकून होते. गणेशोत्सवात कमाल ३ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळाला होता. पण, यंदा दर दबावात आहेत. बाजारात सध्या डाळिंब, सफरचंद, चिकूची चांगली आवक आहे. केळी आणि सफरचंदाचे दर एकसारखेच आहेत. त्यामुळे ग्राहक केळीऐवजी सफरचंदाचा पर्याय निवडतात, याचाही परिणाम झाला आहे.