अमरावती : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात दुचाकीवरील सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. एक जखमी झाला. हा अपघात बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव चौक परिसरात घडला. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अविनाश अंबादास उईके (२४) रा. गणेशपूर, मोर्शी असे मृत सैनिकाचे तर विशाल सुखीराम तुमडाम (१९) रा. टेंबुरखेडा, वरूड असे जखमीचे नाव आहे. अविनाश हा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. नुकताच तो सुटीवर घरी आला होता. बुधवारी सकाळी अविनाश हा मित्र विशाल याच्यासह दुचाकी क्रमांक एमएच २७ डीजी ३९४४ ने कामानिमित्त अमरावतीला जात होता. मार्गात रहाटगाव चौक परिसरातील एका हॉटेलजवळ त्याच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात अविनाशचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल हा जखमी झाला.

हेही वाचा – कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

हेही वाचा – सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताबाबत माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी विशालला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.