पालिकेच्या सोलर सिटी योजनेला हरताळ
नागपूरला सोलर सिटी करण्याकरिता महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू असले तरी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेने नागरिकांच्या मागणीवरून शहरात ३,४५० सोलर वॉटर हिटर लावण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्याकरिता फार कमी अनुदान मिळाल्याने शहरात केवळ १,८१५ सोलर वॉटर हिटर लागले असून १,७३५ वॉटर हिटरचा प्रस्ताव केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयात अडकला आहे. त्यामुळे नागपूर कशी सोलर सिटी होणार, हा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.
भारताच्या मध्यभागी असल्याने नागपूरला देशात विशेष महत्त्व आहे. शहराचे महत्त्व बघता बऱ्याच वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी पुढाकार घेऊन नागपूरला सोलर सिटी करण्याची घोषणा करवून घेतली होती. त्याअंतर्गत शहरात मोठय़ा प्रमाणावर सौरऊर्जा निर्मिती करणारे पॅनल व मोठय़ा प्रमाणावर सोलर वॉटर हिटर लावण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. महापालिकेकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहरात प्रकल्प राबवण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. त्याअंतर्गत महापालिकेने राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडे अनेक सौरऊर्जा प्रकल्पांचे प्रस्ताव पाठवले, परंतु त्यांना केंद्राकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
महापालिकेत भाजपची सत्ता बऱ्याच वर्षांपासून असली तरी प्रथमच महापालिकेसह राज्य व केंद्र अशा तीनही ठिकाणी भाजपचे एकाच वेळी सरकार स्थानापन्न झाले आहे. त्यातच महाराष्ट्रात प्रथमच नागपूरकर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तेव्हा यंदा शहरातील सौर प्रकल्पांसह इतरही सगळेच प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्याची नागपूरकरांना अपेक्षा आहे, परंतु ती पूर्ण होताना दिसत नाही. महापालिकेकडून पाठवण्यात आलेल्या सोलर वॉटर हिटरचा प्रस्ताव अद्यापही केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडे पडून असून त्याकरिता आवश्यक अनुदानही मिळत नसल्याचे पुढे आले आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी शहरात सोलर वॉटर हिटर नागरिकांकडे लावण्यासाठी एक योजना आणली होती.
त्याअंतर्गत शहरातील नागरिकांकडून मागणी झाल्यास त्यांना १४ हजार ८०० रुपयांचे प्रत्येकी एक सोलर वॉटर हिटर दिले जाणार होते. त्यातील ५० टक्के निधी केंद्राकडून मिळण्यासह ५० टक्के निधी हा नागरिकांनाच द्यायचा होता. योजनेची जनजागृती महापालिकेकडून योग्यरित्या न झाल्याने शहरात केवळ ३,४५० नागरिकांकडूनच अर्ज आले. तातडीने हा प्रस्ताव महापालिकेकडून राज्य शासनाच्या मदतीने केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. त्यासाठी पहिल्या टप्प्यात फार कमी अनुदान आल्याने शहरात केवळ १,८१५ नागरिकांकडेच हे सोलर वॉटर हिटर लावण्यात आले. पुढचा निधी अडकून पडल्याने शहरातील १,७३५ सोलर वॉटर हिटरचे प्रस्ताव अडकले आहेत.
योजना बदलल्यामुळे अनुदान थांबले
केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून सोलर वॉटर हिटरसह सौर प्रकल्पांबाबतच्या एका नवीन धोरणावर काम सुरू आहे. अद्याप ते स्पष्ट झाले नसल्याने नागपूर महापालिकेच्या विविध प्रस्तावांचा निधी केंद्रीय पातळीवरच थांबला आहे. योजनेची माहिती पुढे येताच पुढची कारवाई शक्य असल्याचे मत ऊर्जा विभागातील एका जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2015 रोजी प्रकाशित
सतराशे सोलर वॉटर हिटर ऊर्जा मंत्रालयात अडकले
भारताच्या मध्यभागी असल्याने नागपूरला देशात विशेष महत्त्व आहे.
Written by मंदार गुरव
Updated:

First published on: 03-12-2015 at 02:10 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on solar water heater