शाळा माहीत नव्हती असे नाही, पण शाळा आपल्यासाठी असते ही जाणच नव्हती. सकाळी उठल्यावर सिग्नल, बस स्थानक, रेल्वे फलाट किंवा मंदिर गाठून भीक मागायची. सोबत लहान भाऊ-बहिणीला घेऊन जायचे. कुणी भीक द्यायचे तर कुणी हाड हाड करून दूर लोटायचे. अनेकांनी लाथ मारून दूर सारले. रडून चार शिव्या देण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. कधी पोटभर तर कधी अर्धपोटी झोपायचो. पुढचा दिवस तेच जीवन घेऊन यायचा. मात्र, वंचित जीवन जगताना ‘प्रश्नचिन्ही’ हृदय रमले, अशा प्रतिक्रिया जाणत्या-अजाणत्या फासेपारधी मुलांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या.
सहा ते १७ वयोगटातील विद्यार्थी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत शिकत आहेत. पहिली ते दहावीपर्यंत या ठिकाणी शाळा आहे.
लोकसत्ता प्रतिनिधीने अमरावती जिल्ह्य़ातील नांदगाव खंडे तालुक्यातील मंगरूळ चवाळा गावी भेट देऊन अनुसूचित जमातीमध्ये मोडणाऱ्या फासे पारधी या अत्यंत मागास जातीचे आर्थिक, शारीरिक, व्यावसायिक, रोजगाराचे, शैक्षणिक, कौटुंबिक आणि मानसिक अशा सर्वच आघाडय़ांवरील मागासलेपण अनुभवले.
यापैकी १०८ मुलांचे पालक राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगामध्ये चोरीच्या गुन्ह्यांतर्गत शिक्षा भोगत आहेत. अनेक मुलांचे पालक असून नसल्यासारखे आहेत. कारण त्यांची मुले उत्पन्नाचे साधन असताना शाळा शिकत असल्याने त्यांना उपयोग नाही. म्हणून ती अनाथ असल्यासारखीच आहेत. या मुलांना एकल पालक आहेत.
या मुलांपैकी आईबाबांचे बोट धरून कोणीही शाळेची वाट धरली नाही. पायात चप्पल नाही. अंगभर कपडे नाहीत. वह्य़ा पुस्तकांची अपुरी सोबत. सणावाराला गोडधोड नाही. पोटभर अन्न एका स्वयंसेवी संस्थेकडून अलीकडच्या काही दिवसांमध्ये मिळायला लागले.
शाळेची वर्ग खोली झोपडीलाही लाजवेल एवढी नाजूक. अन् खेळायला पटांगण आणि निसर्गाचा सहवास एवढीच काय ती मुलांसाठी जमेची बाजू. बाकी सर्व वंचित, अभावग्रस्त जीवन. बालमनातील आक्रंदन एका गीताच्या माध्यमातून ईश्वर आरमतील भोसले या दुसरीतील मुलाने अशाप्रकारे व्यक्त केले.
पतंगा पतंगा रे, थोडासा तू थांब रे
आई माझी देवाघरी, तिला तूच सांग रे, आठवण येते बाई, उंच उंच आभाळात, आई ना दिसे बाई
कशी जन्म देते आई, भाग्य ते नसे बाई
पोटासाठी भीक मागण्यापेक्षा मुलांना आता शाळा चांगली वाटू लागली आहे. मैत्रिणी आहेत. मित्र आहेत. कोणाचाही मार खायचा नाही. कोणापुढेही हात पसरायचे नाहीत. पोटभर खायचे, अभ्यास करायचा आणि मनसोक्त खेळायचे असे स्वच्छंदी जीवन मुलांना फार आवडायला लागलेत. त्यात काही क्षण मनोरंजनाचेही असतात, असे जितेश आरीन पवार या पहिलीतील मुलाने दाखवून दिले.
कांदा मुस्कुराये, मिरची पास आये
दोनो मिलाके हम पोहे बनाये
अब तो मेरा दिल खाने को कहता है क्या करू बाई तिखट जादा लगता है
मुलांचे प्रश्नांकित जगणे ‘प्रश्नचिन्ह’ या आश्रमशाळेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न मतीन भोसले या तरुणाने चालवला आहे. शिक्षकाची नोकरी झुगारून समाजाला शिक्षित करण्यासाठी भोसले जीवाचे रान करीत आहेत. त्यासाठी पोलीस, गावकरी, आमदार, खासदार यांच्याशी दोन हात करीत आहेत. भीक मागून कुत्र्यासारखे कुठेतरी मरून जाण्यापेक्षा शिक्षणाने शहाणे व्हा आणि समाजालाही पुढे न्या, असा असा संदेश ते त्यांच्या समाजकार्यातून देत आहेत.