scorecardresearch

“…अन् तोच दाढीवाला आज फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला”; अरविंद सावंतांचा CM शिंदेंवर घणाघात

अरविंद सावंत यांनी अमरावती येथे ‘मशाल यात्रे’दरम्यान आयोजित सभेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीकास्र सोडले.

“…अन् तोच दाढीवाला आज फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला”; अरविंद सावंतांचा CM शिंदेंवर घणाघात
फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? म्हणणारे आज त्याच देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसलेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. अरविंद सावंत हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी काल अमरावती येथे ‘मशाल यात्रे’दरम्यान आयोजित सभेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीकास्र सोडले. यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही नाव न घेता टीका केली.

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी; संजय राऊत म्हणाले, “व्हॅलेंटाईन दिवस…”

काय म्हणाले अरविंद सावंत?

“२०१४ मध्ये तत्कालीन भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी युती तुटली, असे जाहीर केले होते. भाजपाला वाटलं की २०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन झाले. आता शिवसेनेचं काही खरं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. यांना चेपून काढला येईल. मात्र, उद्धव ठाकरे २०१४ मध्ये भाजपाविरोधात एकटे उभे राहिले. शिवसैनिकांनी समर्पित होऊन काम केलं आणि पराक्रम घडला. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले. शिवसेना विरोधात बसली आज जे दाढीवाले मिंधे सोडून गेले, त्यांनाच विरोधी पक्षनेते केलं होतं. तरीही त्यांचा जीव सत्तेसाठी खालीवर होत होता”, अशी खासदार अरविंद सावंत यांनी केली.

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एक महिन्याने सुनावणी का? प्रत्यक्ष हजर असणारे वकील म्हणाले, “कारण…”

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं. “एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये भाजपाबरोबर सत्तास्थापन करण्याची मागणी केली होती. हे उद्धव ठाकरेंना तेंव्हाही मान्य नव्हतं. केवळ मिंधे लोकांसाठी त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीवेळी मी प्रचाराला व्यासपीठावर होतो. तेव्हा याच दाढीवाल्या बाबाने मोठी नाटकं केली होती, एक मोठा अर्ज लिहून आणला होता. ‘साहेब, आपल्या सामान्य माणसांची कामं होत नाहीत. गरिबांना न्या मिळत नाही. यांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? माझा राजीनामा घ्या’, असं ते म्हणाले होते. मात्र, तोच बाबा आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होईल का? उज्वल निकम म्हणतात, “ठाकरे गटाची मागणी…”

दरम्यान, त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही नाव न घेता टीकास्र सोडले. “गोरा गोमटा वरवंटा लोक रंगाला बघून बोलतात, हा वरवंटा सगळ्यांच्या डोक्यावरून फिरतो, तरी कुणाला कळत नाही. जात प्रमाणपत्र खोटे असतानाही अजूनही अटक झाली नाही, शेवटी कोर्टाने पोलिसांना विचारले तुम्ही मॅनेज झालात का? हे दुर्दैवच आहे”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या