नागपूर : ब्राह्मण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो. हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुवर्ण्य व्यवस्थेची चौकट घट्ट झाली आणि आपल्याकडून माणसाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले. त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा.वि. मिराशी सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. भागवत बोलत होते.

‘वज्रसूची-टंक’ या ग्रंथावर भाष्य करताना डॉ. भागवत म्हणाले, या पुस्तकात ब्राह्मण कोण, यावर दोन्ही बाजूंनी तर्क मांडले आहेत. ते संशोधनाच्यादृष्टीने उच्च पातळीचे आहेत. पण, आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्यांच्या कर्मामुळे, गुणामुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढय़ांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. हा काळ चंद्रगुप्त साम्राज्याचा होता.

वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत, असेही डॉ. भागवत म्हणाले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप  आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– मोहन भागवत, सरसंघचालक