नागपूर : जरीपटका भागातील बँक कॉलनीत वराह पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर वराह मालकांनी व तेथील लोकांनी हल्ला केला. यात सहाजण जखमी झाले. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून कारवाई थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

शहरातील वराह पकडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाली.  पहिल्या दिवशी ४० वराह पकडण्यात आले. यासाठी तामिळनाडूवरून बोलावण्यात आलेले पथक आज सकाळी जरीपटका बँक कॉलनी परिसरात पोहचले. या ठिकाणी  वराहांच्या मालकांनी प्रारंभी महापालिकेचे अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांना घेराव घातला. मात्र, कुठल्याही परिस्थिती कारवाई थांबवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही युवक लाठय़ाकाठय़ा घेऊन आले व त्यांनी पथकावर दगडफेक केली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या काही युवकांना ताब्यात घेतल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली.  पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. मात्र तोपर्यंत विरोध करणारे पळून गेले. या हल्लात पथकातील सहा लोक जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. रात्री महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. गजेंद्र महल्ले यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.