राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा निवडणुकीबाबत वातावरण तापले आहे. खुद्द कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी मनमानी धोरण राबवून निवडणुकीत विशिष्ट उमेदवारांबाबत अनुकूलता दाखवल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी माजी विधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त ; शासकीय योजनेचे लाभार्थी अतिवृष्टीबाधितांच्या मदतीस अपात्र

विधिसभेच्या दहा जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने सर्व विद्यापीठांसाठी एकसमान कायदा केला आहे. त्यानुसार, निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत किमान ४५ दिवसांचे अंतर असणे अपेक्षित आहे. मात्र कुलगुरूंनी स्वतंत्र अधिसूचना जारी केली. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया केवळ ३८ दिवसांत होत आहे. कुलगुरूंना तसे करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. विशिष्ट संघटनेच्या उमेदवारांना फायदा पोहचवण्यासाठी कुलगुरूंनी अशी खेळी खेळल्याचा आरोप ॲड. वाजपेयी यांनी केला आहे. कुलगुरूंवर आधीच विविध प्रकरणात चौकशीच्या घेऱ्यात आहेत. त्यात आता पदाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोप झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा >>>पर्यटकांसाठी चित्तादर्शन अद्याप दूरच ; ‘टास्क फोर्स’च्या बैठकांवर बैठका; जंगलात सोडण्याबाबत मात्र निश्चिती नाही

मतदानाचा अधिकार डावलला जाण्याची भीती
ॲड. वाजपेयी यांच्या तक्रारीनुसार, विद्यापीठाने २०१७ पर्यंत सर्व नोंदणीकृत पदवीधर विद्यार्थ्यांना मतदार होण्यासाठी आवश्क असलेला ‘बी-फॉर्म’ भरण्यासाठी केवळ ५ दिवसांचा अवधी दिला होता. यंदा दिवाळीमुळे अनेक मतदारांनी नोंदणी केली नाही. त्याचवेळी, विद्यापीठाने २०२२ मध्ये नोंदणी केलेल्या सर्व नवीन पदवीधरांना बी-फॉर्म भरणे अनिवार्य केले नाही. अशा परिस्थितीत या निवडणुकीसाठी जुन्या मतदारांना त्यांचा पत्ता किंवा अन्य माहिती नव्याने जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार डावलला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत निवडणूक रविवारी व्हायची. मात्र यावेळी निवडणूक ३० नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी असून त्यामुळे अनेक मतदार नोकरी सोडून मतदानासाठी येऊ शकणार नाहीत, याकडेही या तक्रारीत लक्ष वेधण्यात आले आहे.

हेही वाचा >>>सरकारकडून उमेदवारांची फसवणूक! ; जिल्हा परिषद भरती रद्द केल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा

उपमुख्यमंत्र्यांकडून कुलगुरूंची कानउघाडणी?
विद्यापीठातील विविध कामांच्या अनियमिततेसंदर्भात उपसचिवांच्या चौकशी समितीने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधातील अहवाल शासनाला सादर केला. यावर डॉ. चौधरी यांना खुलासाही मागण्यात आला. त्यामुळे शासनाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कुलगुरू सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत असल्याची माहिती आहे. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवगिरी निवास्थानी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी कुलगुरूंची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempts by the vice chancellor to influence the election amy
First published on: 03-11-2022 at 09:32 IST