‘सर्वकार्येषू सर्वदा’तून जुळली मानवतेची कडी;
जव्हारच्या आदिवासी पाडय़ांमध्ये सौरऊर्जेने वीज, पाणी
समाजात अनेक माणसे नि:स्वार्थी वृत्तीने सातत्याने समाजासाठी काही तरी करत असतात. अशा नि:स्वार्थी भावनेने काम करणाऱ्या माणसांसाठी ‘लोकसत्ता’ने गेल्या काही वर्षांंपासून ‘सर्वकार्येषू सर्वदा’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या व्यासपीठावर एकत्रित आलेली मंडळी आता एकमेकांसाठी आधारस्तंभ बनली आहेत. बाबा आमटे मानवता पुरस्काराच्या निमित्ताने अशीच एक कडी जुळली गेली आहे.
गोवा स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्रीधरराव पद्मावार, भद्रावती प्रायोजित व विद्यार्थी सहाय्यक समिती वरोराच्यावतीने दरवर्षी बाबा आमटे मानवता पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्काराकरीता पालघर जिल्ह्य़ातील प्रगती प्रतिष्ठान, जव्हारच्या सुनंदा पटवर्धन यांची निवड झाली. विशेष म्हणजे, पुरस्कार देणारी विद्यार्थी सहाय्यक समिती ही गेल्या वर्षी, तर पुरस्कार घेणारी प्रगती प्रतिष्ठान ही यावर्षी ‘सर्वेकार्येषू सर्वदा’च्या व्यासपीठावर होती. समाजासाठी जगणाऱ्या या दोन्ही संस्था यावर्षी लोकसत्ताच्या व्यासपीठावर एकत्र आल्या आणि एकमेकांसाठी आधारस्तंभ बनल्या.
अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबरच आता वीज हीसुद्धा आवश्यक बाब आहे. अजूनही मुंबई-ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावरील आदिवासी पाडे अंधारात आहेत. सौरऊर्जेच्या माध्यमातून आदिवासी पाडय़ांवरील युगानयुगे साचून राहिलेला अंधार दूर करण्याचा निश्चय सुनंदा पटवर्धन यांनी केला. आता त्या ठिकाणी प्रकाशच नव्हे, तर सौरपंपाच्या माध्यमातून पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले जाते. आतापर्यंत ३२ पाडय़ांना आम्ही सौरपंपाद्वारे पाणी दिले आणि त्यामुळे १६ हजार महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली. शुद्ध पाण्यामुळे त्यांचे आरोग्यमान सुधारले, असे पटवर्धन यांनी नमूद केले.
‘सर्वकार्येषू सर्वदा’च्या व्यासपीठावर सुनंदा पटवर्धन यांचे हे कार्य समोर आले आणि याच व्यासपीठावर असणाऱ्या प्रा. मधुकर उपलेंचवार यांनी या वर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. यापूर्वीचे पुरस्कार कोलकाता येथील मामून अख्तर, सातारा येथील डॉ. अविनाश पोळ, गडचिरोली जिल्ह्य़ातील सर्च फाऊंडेशनचे डॉ. अभय बंग, हिवरेबाजार येथील पोपटराव पवार यांना देण्यात आले आहेत.
रविवार, ३ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता वरोरा येथील ज्ञानदा विकास केंद्र परिसरात हा पुरस्कार सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते व वर्धा येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली सुनंदा पटवर्धन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.