दोघांना अटक, चार दिवस पोलीस कोठडीत रवानगी

नागपूर : वडिलांसमोर शिवीगाळ केल्याने गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगडमध्ये रविवारी आनंद ऊर्फ बाबा मनोहर चौधरी (५२) या गुंडाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

राजा लखन सिंग (२३) रा. व्हेटरनरी कॉलेज चौक आणि नाना ऊर्फ सुरेंद्र शेषमल पटेल (२२) रा. गिट्टीखदान अशी आरोपींची नावे आहेत. राजाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल चार महिन्यांपूर्वी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला. असून तोही गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तेव्हापासून तो पंजाबमध्ये गेला होता. महिनाभरापूर्वी तो शहरात दाखल झाला. राजा व बाबा यांच्यामध्ये वैमनस्य होते. रविवारी रात्री राजा व त्याचे साथीदार पानठेल्यावर बसले होते. त्यावेळी बाबा चौधरी तेथे आला. दोघांनी शिवीगाळ केली. त्यावेळी राजाचे वडील तेथे आले व त्यांनी त्याला घरी चलायला सांगितले. यावेळी बाबाने त्याला वडिलांचा आधार घेऊन घरी जाण्यासाठी डिवचले. त्यावेळी तो तेथून निघून गेला. पण, त्यानंतर इतर आरोपींसह कारने परतला. त्यानंतर पानठेल्यावर उभा असलेल्या बाबाला कारमध्ये बसवून घेऊन काही अंतरावर चाकूने त्याच्या पोटात वार केला. रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.