वर्धा:  शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सूरू करणारे माजी आमदार बच्चू कडू यांचे मोठ्या प्रमाणात समर्थन होवू लागले आहे. विविध माध्यमातून संताप व्यक्त केल्या जात आहे. भाजप विरोधक व सामाजिक कार्यकर्ते पण कडू यांचे समर्थन करीत राज्य सरकारला पेचात पकडत असल्याचे चित्र आहे. अमरावतीशी वर्धेपेक्षा अधिक जवळीक साधणारा तालुका म्हणून परिचित आर्वी तालुक्यातून आंदोलनास धार चढू लागली आहे.

प्रहार सामाजिक संघटनेचे बाळा जगताप यांनी कडू समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेणे सूरू केले आहे.  बुधवारी त्यांनी आपल्या समर्थकांसोबत  आर्वी तहसीलदार कार्यालयात आता कपडेच शिल्लक राहले असे म्हणत ते पण ठेवून घ्या, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. आज जगताप परत आक्रमक झाले. त्यांनी रस्ता रोको सूरू केले.

आज अमरावती आर्वी रस्त्यावर जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर लोटांगण घातले. आर्वीतून येणारे भाजप आमदार दादाराव केचे यांची गाडी अडविण्यात आली. रस्त्यावर आंदोलक दिसताच केचे यांनी गाडी थांबवण्यात आली. यावेळी केचे गाडीतून उतरल्यावर जगताप यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारला. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने शेतकऱ्यांवार असलेले कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सोयाबीन पिकास प्रती क्विंटल भाव देणार असल्याची हमी दिली होती.

आता सत्तेवर आलात. मात्र त्यावर चकार शब्द बोलत  नाही. हे कां, असा सवाल जगताप यांनी केला. त्यावर आमदार दादाराव केचे यांनी ही बाब मान्य केली. या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधतो, असे उत्तर दिले. तसेच मी विधान परिषदेच्या सभागृहात शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की मांडतो, असेही कबूल केले. त्यानंतरच आमदार केचे यांची गाडी पुढे निघाली. मात्र या घटनेने काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रहारचे बाळा जगताप व सुधीर जाचक, अंकुश गोटेफोडे, छोटू चव्हाण, गोलू वाघ, विक्रम भगत व अन्य शेतकरी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. बेमुदत अन्नत्याग  करीत आंदोलन छेडणारे बच्चू कडू यांनी विविध मागण्या केल्या आहेत. कर्जमाफी सोबतच दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन, हमीभावावर २० टक्के अनुदान, तरुणांच्या हाताला काम व शेतमालाला दाम, शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजूरास आर्थिक मदत मिळावी, ग्रामीण भागातसुद्धा घरकुल बांधण्यास ५ लाख रुपयाचे अनुदान मिळावे व अन्य एकूण १७ मागण्या आहेत.