वर्धा : निवडणुकीत नातेगोते मदतीस येतात. पण कधी हीच नाती रुसून पण बसतात. काही आप्त आपला माणूस निवडून यावा म्हणून चिंतेत पण असतात. आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना आप्तमंडळी मात्र कामाचे ठरत आहे. त्यांचे सख्खे मामा असलेले माजी मंत्री अनिल देशमुख हे धुरा सांभाळून आहेत. त्यांचे सासरे अशोक शिंदे हे शरद पवार यांचे कौटुंबिक सदस्य असून शिंदे प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. ते अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना आपली कन्या मानतात. नात्याचे एव्हढे भक्कम कोंदण काळे यांना लाभले आहे. ही सर्व मंडळी त्यांच्या प्रचार कार्यवार लक्ष ठेवून आहे. आता त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भर पडली आहे.

बाळासाहेब थोरात हे अमर काळे यांचे मामसासरे, म्हणजे मयुरा काळे यांचे मामा आहेत. त्यांनी आता निवडणूक कार्याबद्दल अमर काळे यांची विचारणा केली. काँग्रेस नेते मनापासून काम करीत आहेत की नाही अशी विचारणा थोरात यांनी केल्याचे समजले. तेव्हा झाडून सर्व काँग्रेस नेते मनापासून काम करीत असल्याचा निर्वाळा काळे यांनी दिला. अशी नातीगोती वेळ प्रसंगी किती कामात येतात, याचा अनुभव अमर काळे घेत आहेत.

हेही वाचा – जिवंत व्यक्ती मृत अन् मृत व्यक्ती जिवंत! चंद्रपुरात मतदार याद्यांचा गोंधळ, नावे नसल्याने मतदार संतप्त

हेही वाचा – “आता बस झाले, यापुढे सभा मिळणार नाही,” कोणी दिला इशारा? जाणून घ्या सविस्तर…

पण चर्चा काळे यांच्या मित्रपक्षाच्या संथ मदतीबद्दल होत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अमर काळे मूळचे काँग्रेसी. उमेदवारी मिळाली म्हणून ते वेळेवर राष्ट्रवादी झाले. त्यामुळे येथील मुळच्या राष्ट्रवादी नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न खुद्द शरद पवार यांनी पहिल्याच टप्प्यात केले. स्वतः काळे यांच्या रॅलीस हजर होत पवार यांनी स्वारस्य असल्याचा थेट संदेश दिला. पण हे मूळचे राष्ट्रवादी अद्याप प्रचारात झोकून देत नसल्याच्या काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी आहेत. हे नवे नाते सांभाळण्यात काळे यांची कसोटी लागत असल्याचे चित्र दिसून येते.