गडचिरोली: प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू २१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे, सुरक्षा यंत्रणांकडून चारही बाजूने आक्रमक कारवाया सुरू असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत चळवळीच्या प्रमुखपदी कुणाची निवड होणार, याकडे सुरक्षा यंत्रणेचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत ‘पॉलिटब्युरो’ सदस्य भूपती आणि देवजी या दोघांची नावे चर्चेत आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करू, अशी घोषणा केली. त्यानंतर देशभरात विशेष करून छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंडमध्ये नक्षलविरोधी कारवायांना गती देण्यात आली. त्यामुळे मागील दोन वर्षात पाचशेहून अधिक नक्षल्यांना विविध चकमकींत ठार करण्यात आले.
नक्षलवाद्यांचे गड समजले जाणारे अबुझमाड आणि करेगुट्टा परिसरात सुरक्षा दलाकडून दररोज नक्षलविरोधी अभियान राबवण्यात येत आहेत. अशातच २१ मे रोजी छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीत थेट नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू ठार झाला. त्याच्यासोबत आणखी २६ नक्षल्यांना टिपण्यात पोलिसांना यश आले.
त्यामुळे चारही बाजूने कोंडीत सापडलेल्या नक्षलवाद्यांसमोर पार्टीचा नवा नेता निवडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यात तेलंगणाच्या आंबेडकरनगर येथील थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी (६१) आणि पेदापल्ली येथील मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू (६९) या दोघांची नावे आघाडीवर आहेत. हे दोघेही पार्टीचे पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समिती सदस्य आहेत. दोघांनी साठी पार केल्यामुळे बऱ्याचदा त्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. हा विचार केल्यास पार्टी ऐनवेळेवर नव्या दमाच्या सदस्याची निवड करू शकते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हणणे आहे.
अशी आहे पार्श्वभूमी
- ब्राह्मण कुटुंबातून येणारा भूपती ऊर्फ सोनू गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय आहे. त्याचे इंग्रजी, हिंदी, गोंडी, माडिया आणि तेलगू भाषेवर प्रभुत्व आहे. वरिष्ठ नक्षल नेता किशनजी त्याचा मोठा भाऊ होय. अनेक मोठ्या हल्ल्यात त्याचा सहभाग आहे. सरकारविरोधी कारवायांच्या योजनेसह चळवळीतील नेत्यांना आणि सक्रिय सदस्यांना बौद्धिक देण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो अभय या नावाने देखील माध्यमांच्या संपर्कात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी तारक्काने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
- अनुसूचित जातीतून येणारा देवजी हा देखील पार्टीत ३५ वर्षांपासून सक्रिय असून सध्या त्याच्याकडे दक्षिण बस्तरसह ‘मिलिट्री कमांड’ची जबाबदारी आहे. काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी सृजनक्का गडचिरोलीतील भामरागड कोठी परिसरात झालेल्या चाकमकीत ठार झाली होती. गुरील्ला वारमध्ये निष्णात असलेल्या देवजीचा अनेक चकमकीत सक्रिय सहभाग राहिला आहे.