नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात मुलांच्या तुलनेत मुलीचा जन्मदर आणखी कमी झाला आहे. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आले आहे. नागपूर शहरातील मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदर किती?, नागपुरात एकूण किती बालकांचा जन्म झालासह इतरही महत्वाच्या आकडेवारीबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर शहरात २०२२ मध्ये १०० मुलांमागे ९२ मुलींचा जन्म नोंदवला गेला. ही संख्या २०२३ मध्ये शंभर मुलांमागे ९६ मुली अशी होती. २०२४ मध्ये १०० मुलांमागे ९२ मुली तर २०२५ मध्ये ३१ मार्च २०२५ पर्यंत १०० मुलांमागे ९२ मुली असा जन्मदर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नागपुरातील विविध रुग्णालयांत १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत एकूण ५१ हजार ८८२ बालकांचा जन्म झाला.
ही संख्या २०२३ मध्ये ३५ हजार ३८७ बालक, २०२४ मध्ये २२ हजार ६९७ बालक, १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान तीन महिन्यात ५ हजार ४३२ बालक होती. परंतु त्यातील मुले व मुलींची संख्या बघितल्यास मुलींच्या तुलनेत मुलांच्या जन्माचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उपराजधानीत मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनासह महापालिकेलाही जनजागृती करावी लागणार आहे.
नागपुरात वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार स्थिती काय ?
नागपूर जिल्ह्यात १४ तालुकांचा समावेश होतो. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार १७१ इतकी होती. यातील नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ९११ इतकी होती. तर, उर्वरित जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ४२१ इतकी होती. या जिल्ह्यातील स्त्रि- पुरुष प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९४८ महिला असे होते. २००१ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९३२ महिला इतके होते. त्यामुळे या प्रमाणात किंचित सुधारणा झालेली दिसते.
नागपुरात जन्मलेल्या बालकांची आकडेवारी
वर्ष | मुले | मुली | एकूण |
२०२२ | २६,९७४ | २४,९०८ | ५१,८८२ |
२०२३ | १८,०४० | १७,३४७ | ३५,३८७ |
२०२४ | ११,८०१ | १०,८९६ | २२,६९७ |
२०२५ (३१ मार्च पर्यंत) | २,७२० | २,७१२ | ५,४३२ |