भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया २० जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून नागपूर शहर अध्यक्षाची निवड पुढील आठवडय़ात १४ ते १६ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे.
संघटनात्मक निवडणुकांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी नागपूर येथे रविभवनात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पहिल्या दिवशी पूर्व विदर्भातील जिल्ह्य़ांचा आढावा घेण्यात आला. उद्या, रविवारी पश्चिम विदर्भातील जिल्ह्य़ांची बैठक होणार आहे. पक्षाचे विदर्भाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, आमदार अनिल सोले यांच्यासह त्या त्या जिल्ह्य़ातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडून मंडळ अध्यक्षांची नियुक्ती, सदस्य नोंदणी, बुथ समितीबाबत माहिती घेण्यात आली. सुरुवातीला नागपूर शहराची बैठक झाली. त्यात सदस्य नोंदणी आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा झाली. शहराध्यक्षांची निवड १४ ते १६ जानेवारीदरम्यान केली जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वाना मान्य असेल, असे शहर व ग्रामीणच्या नेत्यांनी सांगितले. सहा विधानसभेच्या मंडळ अध्यक्षांची नावे रविवारी दुपारी जाहीर करण्यात येणार आहेत. याच दरम्यान विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर २० जानेवारीपर्यंत प्रदेश भाजपाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्षांची निवड सहमतीने करण्याचे पक्षाचे प्रयत्न असले तरी यात नागपूरसह प्रत्येक जिल्ह्य़ात चुरस असून त्याचे प्रतिबिंब बैठकीदरम्यान पाहायला मिळाले. गटातटात जाऊन काही कार्यकर्ते भेटले.