‘ब्रेललिपी’तून दालनांची माहिती; आज जागतिक संग्रहालय दिन
ब्रिटिशांनी भारतावर शेकडो वर्षे राज्य केले. त्यांच्या कार्यकाळात नागपूर शहर आजच्याइतकेच महत्त्वाचे होते. जेव्हा भारत सोडून जावे लागले, तेव्हा त्यांनी नागपूरला ‘अजब बंगला’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या रूपात अनमोल देणे दिले. भारतीय भूमीतील सांस्कृतिक श्रीमंतीचा वारसा जपणाऱ्या या संग्रहालयाचा लौकिक वाढवण्यासाठी त्यांनीही हातभार लावला. या श्रीमंतीला दरम्यानच्या काळात कीड लागली असली तरीही आता पुन्हा एकदा हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या वारशाचा अनुभव आता दृष्टिहिनांनासुद्धा घेता येणार आहे. यासाठी पाऊल संग्रहालय प्रशासनाकडून उचलले जात आहे.
दृष्टिहिनांना फक्त स्पर्शाची भाषा कळते, स्पर्शातून अनुभूती होते. हे दैनंदिन आयुष्यसाठी ठीक असले तरीही व्यावहारिक आयुष्यात काही गोष्टी असाव्याच लागतात. यातूनच ‘ब्रेललिपी’ उदयास आली आणि दृष्टिहिनांचा व्यावहारिक आयुष्यातील प्रश्नही सुटला. नागपूरच्या या मध्यवर्ती संग्रहालयात भेट देणारे पर्यटक आधीच कमी असताना दृष्टिहिनांनी येथे येणे ही कठीणच बाब होती. तरीही गेल्यावर्षी जागतिक संग्रहालय दिनानिमित्त दृष्टिहिनांनी मध्यवर्ती संग्रहालयाची सैर केली.
अंधांनी मूर्तीना स्पर्श करून जेवढी अनुभूती घेता आली तेवढी घेतली, पण प्रत्येकच गोष्ट स्पर्शातून अनुभवता येणारी नव्हती. त्याचवेळी अंधांसाठी सर्व माहिती ब्रेललिपीत का असू नये, असा विचार संग्रहालय प्रशासनाच्या मनात आला आणि त्यासाठी अनाम प्रेम या संस्थेने मदतीचा हात पुढे केला. मध्यवर्ती संग्रहालयातील दहाही दालनांमध्ये असणाऱ्या वस्तूंची माहिती आता ब्रेललिपीत तयार करण्याचे काम सुरू आहे.
मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरातच ठळक माहिती ब्रेललिपीत शब्दबद्ध करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यापासून हे काम सुरू झाले असून कामाची गती पाहता येत्या डिसेंबपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षांअखेरीस दृष्टिहिनांना स्पर्शातून मिळणाऱ्या अनुभूतीसह ब्रेललिपीमुळे त्या सर्व वस्तूंचा इतिहासही जाणून घेता येणार आहे. मध्यवर्ती संगहालयाकडे पाठ फिरवलेल्या पर्यटकांना पुन्हा एकदा इकडे वळवण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

संग्रहालय प्रशासन सिद्ध
गेल्यावर्षी जागतिक संग्रहालय दिनाला दृष्टिहिनांसोबत काही अस्थिव्यंगांनीही भेट दिली होती. मात्र, त्यांना जाण्यायेण्यासाठी रॅम्प किंवा रोलिंग नव्हते. सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आता रॅम्प आणि रोलिंग तयार झाले आहे. एवढेच नव्हे तर येत्या महिन्यात अस्थिव्यंगांसाठी व्हीलचेअरसुद्धा येणार आहे. त्यामुळे सामान्य पर्यटकच नव्हे तर असामान्य पर्यटकांनाही आता मध्यवर्ती संग्रहालयाची सफर घडवून आणण्यासाठी संग्रहालय प्रशासन सिद्ध झाल्याचे अभिरक्षक व पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी सांगितले.