लोकसत्ता टीम
बुलढाणा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी भाजपा कार्यकर्त्यास मारहाण केलीच नसल्याचा दावा कांग्रेस नेत्यांनी केला आहे. बोन्द्रे यांच्यावरील कथित खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी नेत्यांनी केली आहे.
स्थानिय जिल्हा काँग्रेस कार्यालयात आज, रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदारद्वय दिलीपकुमार सानंदा व हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी व दावा केला. ऐनवेळी आयोजित या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा भडिमार होत असल्याचे लक्षात घेता नेत्यांनी पत्रकार परिषद मध्येच आटोपती घेतली. यावेळी सपकाळ म्हणाले की, भाजपकडून गल्ली ते दिल्ली मनमानी व दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. ईडी, आयकर, सीबीआय विभाग मनमानी करीत आहेत. राहुल बोन्द्रे यांच्या संस्थांत पाच हजारावर कर्मचारी आहेत, त्यांच्या कुटुंबाची शंभर एकर जमीन आहे. इतकी मालमत्ता असणारा माणूस भाजप कार्यकर्त्याच्या खिशातील पाच हजाराची रक्कम व चेन हिसकावून घेईल का, हा प्रश्न आहे.
पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचे कलम कोणत्याही पूर्वचौकशी शिवाय लावल्याचा आरोप त्यांनी केला. या दडपशाहीची चौकशी करून दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे ही आमची मागणी आहे. राहुल बोन्द्रे यांच्या दिवंगत पित्याविरुद्ध वाकदकर यांनी समाजमाध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह ‘पोस्ट’ बद्धल काहीच कारवाई करण्यात आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा- अमरावती : सुटीच्या दिवशीही संपकर्त्यांचा जिल्हा परिषदेसमोर डेरा; सोमवारी ‘थाली बजाओ आंदोलन’
दिलीपकुमार सानंदा यांनी कुणीही कायदा हाती घेऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून बोन्द्रे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. आपण वा जिल्हा काँग्रेस, बोन्द्रे यांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन करणार काय, असा प्रश्न विचारला असता, या दोन्ही नेत्यानी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला. वाकदकर यांची पोस्ट आपण पाहिली काय, असे विचारले असता नाही असे सांगितले.
बोन्द्रे यांच्या मारहाण प्रकरणी वक्तव्याबद्धल विचारले असता त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रश्नांचा भडिमार होताच, पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली. पत्रकार परिषद महाविकास आघाडीची असली तरी या दोन नेत्यांनीच संबोधित केले. यामुळे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे, राजेश एकडे, ज्येष्ठ नेते श्याम उमाळकर, सुनील सपकाळ, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांना केवळ बघ्याची भूमिका वठवावी लागली. जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे जिल्हा कार्यालय परिसरात होते, मात्र पत्रपरिषदेला ते उपस्थित राहिले नाही, हे विशेष.