नागपूर : सदरमधील मंगळवारी बाजारात दुकान लावण्यासाठी दलाली घेणाऱ्या एका दलालाची पैशाच्या वादातून रॉड व सत्तूरने हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. सुभाष मोहुर्ले (२३) रा. शिवाजीनगर, महाल असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एका आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी बाजारातील दुकानांकडून दलाली वसूल करण्याचे कंत्राट सुभाषला मिळाले होते. बाजार परिसरात दुकान लावण्यासाठी तो पैसे घेत होता. आज बाजाराचा दिवस असल्याने रात्री तो बाजारात आला. याचदरम्यान चार युवकांनी त्याच्यावर रॉड व सत्तुरने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. त्यानंतरही मारेकऱ्यांनी त्याच्यावर शस्त्राने वार केले व पसार झाले. घटनेच्या एका तासानंतर सदर पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून सदर पोलिसांनी मृतदेह मेयो रुग्णालयात रवाना केला. इमामवाडय़ातील रिंकू नावाच्या युवकाने साथीदारांच्या मदतीने सुभाष याची हत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
बाजारात खून, साक्षीदार मिळेना?
मंगळवारी बाजार परिसरात सुभाष याच्या मामाचे दुकान आहे. त्याच्या मामाच्या दुकानामागेच सुभाष याची हत्या करण्यात आली. मात्र पोलीस पोहोचेपर्यंत मामाला सुभाष याची हत्या झाल्याचे कळले नव्हते. हजारोंची गर्दी असलेल्या भर बाजारात हे हत्याकांड घडले. मात्र बाजारातील एकही दुकानदार घटनेबाबत किंवा मारेकऱ्याबाबत पोलिसांना माहिती देत नव्हता. सर्वानी बघून खुनाच्या घटनेकडे दुर्लक्ष केले. जवळपास तासभर मृतदेह तसाच पडून होता.