बुलढाणा : विदर्भ पंढरी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानात भगवान श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमी सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सोमवारी मध्यरात्री श्रीकृष्ण प्रेमी भाविकांचा मेळा जमल्याचे चित्र दिसून आले.

सजविलेले मंदिर, मनमोहक विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट करण्यात आलेल्या आणि फुलांनी सजविण्यात आलेल्या पाळण्यात असलेली कान्हाची चिमुकली मूर्ती, ब्रह्म वृंदांचे मंत्र उच्चार व सनई चौघड्यांचा निनाद, गुलाब पुष्पांची करण्यात येणारी उधळण, ‘गण गण गणात बोते’चा जयघोष असा यंदाच्या श्रीकृष्ण जयंतीचा थाट होता. मध्यरात्रीनंतरही हजारो भाविकांनी मंदिर गजबजल्याचे सुखद चित्र दिसून आले. भक्ती रसात ओले चिंब झालेले भाविक जन्मोत्सवनंतरही मंदिर परिसरात दीर्घ वेळ रेंगाळत राहिले.

भजन, किर्तनांनी रंगत

यंदाची जन्माष्टमी (श्रीकृष्ण जन्मोत्सव) श्रावण सोमवारी आला. यामुळे ‘हरी -हर’ आराधानेचा दुर्मिळ योग जुळून आला. जन्माष्टमी आणि श्रावण सोमवारचा उपवास करून भाविकांनी महादेव आणि श्रीकृष्ण या दोन्ही दैवतांची आराधना केली. या दुर्मिळ योगामुळे यंदाच्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाला भाविकांची जादाच गर्दी आणि द्विगुणित उत्साह दिसून आला. पावसानेही उत्सव सोहळ्यात जास्त व्यत्यय आणला नाही.

हेही वाचा – गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…

गजानन महाराजांमध्येच आपले आराध्य दैवत पाहणारे हजारो भाविक कोणत्याही उत्सवाला संतनगरी शेगावमध्ये डेरे दाखल होतात. यंदाचा श्रीकृष्ण जयंती सोहळा देखील या अलिखित परंपरेला अपवाद ठरला नाही. बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मुक्कामी आलेल्या हजारो आबालवृद्ध भाविकांनी संध्याकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली. ही गर्दी उत्तरोत्तर वाढतच गेली आणि मध्यरात्री तर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः कळस गाठला! श्रीकृष्ण जन्मोत्सवनिमित्त सोमवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ दरम्यान श्रीकृष्ण चारित्र्यावर आधारित भजन रंगले. यामुळे जन्माष्टमीची वातावरण निर्मिती झाली. भजनापाठोपाठ रात्री दहा ते बारावाजेदरम्यान कीर्तनकार प्रमोदबुवा राहाणे, (पळशी) यांचे सुश्राव्य किर्तन झाले. हजारो भाविकांनी कीर्तन श्रवण केले. या कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित भाविक कीर्तनात दंग झाले.

शंख नाद, जयघोष…

त्यानंतर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सोमवारी १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सुशोभित पाळणा, श्रीकृष्ण नामाचा जयघोष, जय गजानन श्री गजानन, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या मंत्राचा नाम जप करत, शंखनाद, गोपाळ कृष्ण भगवान की जय असा जयघोष करत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविक भक्तांनी शिस्तीत रांगेत उभे राहून दर्शन घेतले. भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला. जन्माष्टमी उत्सवनिमित्त संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीने सुसज्ज नियोजन करून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मंदिर परिसरात ठिकठिकाणी सेवेकरी भाविकांच्या सोयीसाठी तैनात करण्यात आले होते. शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसर आणि मंदिर मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मंदिर मार्ग परिसर भाविकांनी रात्री उशिरापर्यंत फुलून गेला होता.

हेही वाचा – बँक घोटाळा प्रकरणात नवीन घडामोड… सुनील केदार यांची आता मौखिक सुनावणी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकर्षक सजावट

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गजानन महाराज मंदिरात ठिकठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानांचे तोरणे लावण्यात आली होती. मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली.