बुलढाणा : राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य यंत्रणासाठी कडवे आव्हान ठरलेल्या केसगळती व टक्कल आजाराचा धोका अजूनही टळला नसताना जिल्ह्यात आता ‘जीबीएस ‘ चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणात खळबळ उडाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी प्रामुख्याने पुणे सारख्या महानगरात जीबीएस अर्थात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ चे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहे. राज्यात या विचित्र आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. अमरावती विभागात प्रामुख्याने शेजारील अकोला जिल्ह्यात काही दिवसापूर्वी जीबीएस ने शिरकाव केला होता. यामुळे नजिकच्या बुलढाणा जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ही धास्तीवजा शक्यता दुर्देवाने खरी ठरली आहे.

या पार्श्वभूमीवर आता बुलढाणा जिल्ह्यात या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती आणि माध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जळगाव जामोद तालुक्यात या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. खेर्डा बुद्रुक या गावातील साडे आठ वर्षाच्या बालकाला जीबीस ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाचे म्हणणे काय?

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी याला दुजोरा दिला. या बाधित बालकावर अकोला येथे उपचार करण्यात येत असल्याचे या सूत्रांनी सांगितले. रुग्ण आढळून आल्याने जळगाव जामोद तालुक्यातील रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नसून चार लाख लोकसंख्ये मागे एखादा रुग्ण आढळणे सामान्य बाब आहे. काही महानगरात एकाच भागात जास्त रुग्ण आढळल्याने तेथील लागण वा प्रादुर्भाव गंभीर विषय ठरला असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. खेर्डा बुद्रुक गावाला जळगाव तालुक्यातील आरोग्य पथकाने भेट दिली असून पाहणी व जन जागृती करण्यात येत असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टक्कल’ चे काय?

दरम्यान शेगाव ला लागून असलेल्या जळगाव जामोद तालुक्यात जीबीएस चा शिरकाव झाल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेगाव तालुक्यातील आकस्मिक केस गळती आणि टक्कल पडण्याच्या अनामिक आजाराचे संकट अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. सद्या रुग्णांची संख्या २९३ च्या इतकी आहे. मागील ८ जानेवारी २०२५ ला प्रथम रुग्ण आढळून आले होते. जानेवारी अखेर तेरा गावातील रुग्णसंख्या २४६ इतकी होती. फेब्रुवारी मध्ये आणखी तीन गावात रुग्ण आढळून आल्याने बंधूत गावांची संख्या १६ झाली.आज २४ फेब्रुवारी अखेर ही संख्या २९३ वर पोहोचली आहे. मात्र केंद्र सरकारच्या अख्त्यारितीलदिल्ली व चेन्नई स्थित भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा या गूढ आजारावरील अहवाल अजूनही मिळाला नाहीये. मागील तीन फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे हा अहवाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र ऐनवेळी महाराष्ट्र सदन मध्ये आयोजित पत्र परिषद स्थगित करण्यात आली. त्यानंतर मात्र हा अहवाल जाहीर करण्याला अजून मुहूर्त मिळाला नाहीये. यामुळे आजारचे गूढ, भीती कायम आहे.