बुलढाणा: कोणत्याही रक्तपाताचे कारण ‘जर, जोरू, जमीन’ असते. आपल्या पूर्वजानी अनुभवातून रक्त रंजित संघर्षाची, हत्येची ही कारण मिमांसा केली आहे. वर्षानुवर्षे कोणत्याही हिंसक घटनेमागे हिच तीन कारणे असल्याचे दिसून येते.
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील व मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात शेत जमिनीच्या हद्धीवरून रक्ताचे नाते असलेल्या नातेवाईकांत रक्त रंजित संघर्ष उडाला. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास डोणगाव, नागापूर परिसरात नात्याला कलंक लावणारा हा घटनाक्रम घडला. वादाचे रूपांतर वादंगात आणि त्याचे पर्यवसन भीषण हल्ल्यात झाले. नातेवाईकांचे दोन गट एकमेकांवर चालून गेले, लाठ्या काठ्या, लोखंडी सळया (कांबी), दगड व हाती मिळेल ते साहित्य घेऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ले चढविले. यात काळिभोर शेत जमीन सांडणाऱ्या रक्तांनी लाल भडक झाली. काळ्याभोर शेतीला जणू काही लाल भडक रक्ताचा सडा घातला असे घटना स्थळीचे भयावह दृश्य होते.
शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये उसळलेल्या या तुफान राड्याने नागापूर व डोणगाव परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काठ्या, दगड, लोखंडी सळईने हल्ले चढवले. रक्त सांडून जमिन लाल झाली! थरार इतका वाढला की एकमेकांना रक्त भंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली.
या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. शेख अय्याज ( वय ३६) असे मृतकचे नाव आहे. जागिर खान शब्बीर खान (४०), मोतीन बी (२४), इम्रान खान शब्बीर खान (३४), शबाना बी (४३), रखाना बी (३५) आणि रीधवाना बी (६०) यांसह अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलवीन्यात आले.
गंभीर जखमीना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी देखील जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी उसळली असून घटना स्थळ परिसरातील तणाव कायम आहे. डोणगाव परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
