बुलढाणा: बुलढाणा शहराच्या उत्तर सीमेच्या टोकावर मिर्झा नगरला लागून असलेल्या वस्तीत उत्तररात्री आग लागली. आग एवढी भीषण होती की वस्तीतील पाच घरांची राख झाली. एका ठिकाणाहून लागलेली ही आग हळूहळू इतर घरापर्यंत पोहोचली. दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हा अग्नीतांडव सुरू झाला.
ही वस्ती डोंगराळ भागाला लागून असल्याने जोरदार वाऱ्यामुळे आगीने पाहता पाहता रौद्र रूप रूप धारण केले. दरम्यान काही समाज सेवकांनी या आगीची माहिती बुलढाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला दिली. यानंतर पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग जास्त भडकल्याने नजीकच्या चिखली नगर परिषदेच्या दलाला पाचरण करण्यात आले.
बुलढाणा नगरपालिकेचे दोन अग्निशमन वाहन आणि चिखलीचे एक मिळून तीन वाहनांनी तब्बल अडीच ते तीन तासापर्यंत सतत पाण्याचा जोरदार मारा केला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवता आले. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु घरे खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. जीवाची बाजी लावून आग विझवणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जळालेली घरे मजूर वर्गाची आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज बुधवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुसतीच पाहणी करून ते थांबले नाही, तर त्यांनी तीन आगग्रस्ताना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत दिली.