बुलढाणा : चिखली तालुक्यातील मलगी येथील एका घरात घरगुती सिलिंडर गॅस चा अचानक स्फोट झाल्याने आई व मुलगा गंभीर जखमी झाले. यात दोघे माता पुत्र गंभीररित्या भाजल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय ( घाटी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शोभा रमेश परिहार आणि राजेश रमेश परिहार अशी गंभीर जखमी माय लेकाची नावे आहे.चिखली तालुक्यातील मलगी येथील रहिवाशी असलेल्या अंगणवाडी मदतनीस शोभाबाई रमेश परिहार यांच्या पतीचे १० ते १२ वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे घरामध्ये शोभाबाई रमेश परिहार व त्यांचा मुलगा राजेश रमेश परिहार (वय २४ वर्ष )हे दोघेच घरात राहतात. काल मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता श्रीमती शोभाबाई परिहार या स्वयंपाक खोली मध्ये स्वयंपाक करत होत्या. मात्र अचानक तांत्रिक बिघाडामुळे गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.
गॅस सिलिंडरचा स्फ़ोटचा जोराचा आवाज आल्याने गावकऱ्यांनी परिहार यांच्या घराकडे धाव घेतली. स्फोटामध्ये शोभाबाई परिहार व मुलगा राजेश परिहार हे दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. महिलेच्या अंगावरील साडी जळाली. हाताला भाजले असून डोक्याची केस जळाली आहे. मुलगा राजेश याच्या पायाला भाजले आहे. गंभीर जखमा व प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालय संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आले.
चिखली नगरपरिषद अग्निशमन दलाचे वाहन आणि चिखली पोलीस स्टेशन ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत राऊत, सरपंच विनायक सिताराम साप्ते, दिलीप शंकर शितोळे यांनी सहकार्य केले.