बुलढाणा : जिल्हा मुख्यालय आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बुलढाणा मधील नगर पालिकेची निवडणूक यंदा चुरशीचा कळस गाठणारी ठरणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत ३ आजी माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच सर्वपक्षीय नेत्यांची नजर अध्यक्ष पदावर आहे. यामुळे किमान कामचलाऊ बहुमतासाह अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारणे यावर यंदाची लढत केंद्रित झाली आहे. यापरिणामी बुलढाण्यातील लढत चुरशीची ठरली असून यामध्ये बाजी कोण मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या २ डिसेंबर रोजी पालिका निवडणूक साठी मतदान होणार आहे. ३ तारखेला मतमोजणी होऊन बुलढाण्याचा नगराध्यक्ष आणि ३० सदस्य, बहुमत कोणाला याचा फैसला होणार आहे. बुलढाणा नगरपरिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला साठी निघाले आहे. यामुळे अध्यक्ष पदासाठी इच्छुक अनेक इच्छुकांना माघार घ्यावी लागली. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड ( शिवसेना शिंदे गट) यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड, काँग्रेसचे सुनील सपकाळ याची मासले वाईक उदाहरणे ठरली.

तिरंगी लढतीची चिन्हे

प्रारंभी यंदाची लढत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच होणार असे चित्र होते. मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे व आमदार संजय गायकवाड यांच्यातून विस्तव जात नाही. निवडणुकीच्या तोंडावर या दोघा नेत्यांत वाटाघाटी ऐवजी डिफेन्डर गाडी, विधानसभेत एक कोटी घेतले सारख्या गंभीर आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदीच रंगली. त्यामुळे दोघांनी स्वबळाची तयारी चालविली आहे. या जुन्या मित्रात युती होण्याची शक्यता धूसर आहे. मात्र भाजपा व अजितदादा गटात युती होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बुलढाण्यात आघाडी, भाजपा आणि शिंदे गट अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहे. आघाडीत बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या वाट्यावर आली आहे. बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आपल्या ‘होम टाऊन’ मध्ये अध्यक्ष पद पटकावणे व पक्ष( आघाडीला) बहुमत मिळवून देण्याचे आव्हान सपकाळ यांच्या समक्ष आहे.

काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या अर्धांगिनी लक्ष्मी काकस यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवाराचे नाव गुप्तच ठेवले आहे. मात्र त्यांना कोणत्याही स्थितीत पालिकेतील सत्ता अबाधित ठेवणे आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी तथा माजी पालिका अध्यक्ष पूजा गायकवाड या रिंगणात उतरू शकतात. भाजपा तर्फे ६ जण इच्छुक आहे. त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या अर्धांगिनी अर्पिता शिंदे यांचाही समावेश आहे. अटीतटीच्या स्थितीत त्या उमेदवार राहू शकतात. यामुळे बुलढाण्यातील लढत किती चुरशीची आणि टोकाची आहे हे स्पष्ट होते.

परिणामी बुलढाण्यात महाविकास आघाडी, शिवसेना ( शिंदे गट) अशी चुरशीची तिरंगी लढत रंगणार अशी चिन्हे आहेत. हे तिघे आजी माजी आमदार धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे उमेदवार ऐवजी यंदाची लढत या तीन दिग्गज नेत्यामधील ठरली आहे.

मागील लढत

गत निवडणुकीत एकसंघ शिवसेनेला सर्वाधिक म्हणजे १० जागा मिळाल्या. काँग्रेसला ७, भाजपला ५, एकसंघ राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या होत्या. एका जागी अपक्षाने बाजी मारली. दोन जागी विजय मिळविणाऱ्या भारिप ने थेट अध्यक्ष पदाच्या लढतीत देखील बाजी मारत मोठा उलटफेर केला होता. अध्यक्षपदी भारिप च्या नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद या विजयी झाल्या.