बुलढाणा : गेल्या तीन दशकांपासून रखडलेल्या पेनटाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा जटील प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. दीर्घकाळ लालफीतशाहीत अडकलेल्या पुनर्वसन प्रस्तावाची कोंडी अखेर फुटली असून ४०१ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भूखंडाचे वितरण करण्यात आले आहे. दीर्घ विलंबानंतर का होईना पेनटाकळी येथील ग्रामस्थांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मागील १९९८ पासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रश्नासाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. सनदशीर मार्गाने पाठपुरावा केला. बारा दिवस प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्दवाढीसाठी उपोषण केले होते. ते आंदोलन पेनटाकळी ते मुंबईपर्यंत गाजले.

नेत्यांचे अपयश

विद्यमान केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे १९९५ पासून मेहकर मतदारसंघांचे आमदार होते. त्यानंतर २००९ मध्ये मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव झाला. त्यानंतर २००९ पासून ते बुलढाण्याचे खासदार झाले. बुलढाण्याचे सलग चारदा खासदार राहिले. दुसरीकडे संजय रायमूलकर हे २००९ पासून सलग तीनदा आमदार राहिले. राज्यात व केंद्रात युतीची सत्ता असतानाही पेनटाकळीवासीयांना न्यायासाठी तीन दशके दीर्घ प्रतीक्षा करावी लागली.

अखेर प्रश्न मार्गी

मात्र उशिरा का होईना गावकऱ्यांना न्याय मिळाला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करून प्रशासकीय पातळीवर व मंत्रालय येथे पाठपुरावा केला होता. शासनाच्या मान्यतेनंतर ७ हेक्टर ८२ आर जागेवर एकूण ४०१ भूखंड तयार करण्यात आले. नियोजित आराखड्यानुसार या भूखंडाचे काल १७ मे रोजी गावकऱ्यांना वितरण करण्यात आले. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः गावात दाखल होत लाभार्थ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला. गावातील ४०१ नागरिकांना हक्काचे घर बांधण्यासाठी प्लॉटचे वितरण केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मेहकरचे तहसीलदार निलेश मडके,सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एम.जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे, मंडळ अधिकारी गजानन ढोके,तलाठी सागर जायगुडे,ग्राम विकास अधिकारी डी.बी.काळे, मोहन मगर, गजानन लहाने,जी.पी.मवाळ, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी, शिवसेनेचे पंजाब इंगळे, पुंजाजी इंगळे, भुंजग इंगळे, संतोष डुकरे, अमोल म्हस्के, सरपंच, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.