बुलढाणा : मित्रांसह पोहायला गेल्यावर नदीत बुडालेल्या बालकाचा मृतदेह अखेर विसेक तासानंतर सापडला आहे. आज गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी सकाळपासून राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मोताळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कुणाल सिद्धार्थ इंगळे (वय १४ वर्षे, राहणार जहागीरपूर,तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा) असे दुर्देवी मृत बालकाचे नाव आहे. तो इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. त्याचे वडील गुरे चारण्याचे काम करतात. काल बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी शाळेला महालक्ष्मी (गौरी पूजन) निमित्त सुट्टी असल्याने तो बुधवारी, संध्याकाळी दोन मित्रांसह गावानजीक असलेल्या नळगंगा नदीत पोहायला गेला होता. नदीच्या खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने हे तिघे बुडायला लागले. सुदैवाने दोघे जण कसेबसे बचावले असले तरी मात्र कुणाल नदी पात्रात बुडाला. त्याच्या मित्रांनी दुर्घटनेची माहिती इंगळे कुटुंबीय आणि गावाकऱ्यांना दिली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच इंगळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकरी, नातेवाईक आणि पोहण्यात तरबेज काही व्यक्तींनी कुणाल याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे हा शोध थांबविण्यात आला. दुदैवी घटनेत बालकाचा जीव गेल्याने जहांगीरपूर गावात शोककळा पसरली होती.
हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांची चिंता वाढणार, सर्वच परीक्षा लांबणार?
हेही वाचा – नितीन गडकरींचे देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पत्र; जाणून घ्या नेमका विषय काय?
शोध पथक दाखल
दरम्यान या घटनेची माहिती काही जागृक नागरिकांनी मोताळा तहसील कार्यालयाला दिली. त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला दिली. यामुळे जिल्हाधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शोध व बचाव पथक मोताळाकडे रवाना झाले. आज गुरुवारी सकाळीच हे पथक जहांगीरपूर गावात दाखल झाले. त्यांनी सकाळपासून कुणाल याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पथकाच्या अथक परिश्रमानंतर अखेर नदीच्या तळाला असलेला कुणाल याचा मृतदेह हाती लागला. यामुळे घटनास्थळी आणि गावात एकच आकांत उसळला. पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू (मर्ग) अंतर्गत नोंद घेतली आहे. पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार ,पोलीस हवालदार रशीद पटेल, श्रीकांत गाडे, नायक संदिप पाटील, जमादार गुलाबसिंग राजपूत, सलीम बरडे, अमोल वाणी, संतोष साबळे, प्रदिप सोनवणे यांचा पथकात समावेश होता.