|| चंद्रशेखर बोबडे
मे-जूनमध्ये प्रतिमनुष्य दिवस रोजगारात घट

नागपूर : करोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरित मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेने (मनरेगा) दुसऱ्या लाटेच्या काळातही सातत्य कायम ठेवले. मात्र या काळात ग्रामीण भागात असलेली टाळेबंदी आणि उद्योगचक्र पुन्हा सुरू झाल्याने पुन्हा शहराकडे मजूर वळल्याने रोजगाराची मागणी कमी झाली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मे-जून महिन्यात प्रतिमनुष्य दिवस रोजगार निर्मितीत किंचित घट झाल्याचे दिसून येते.मनरेगा आयुक्तालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २०२० मध्ये मे महिन्यात १ कोटी ४७ लाख ४६ हजार ५०५ मनुष्य दिवसाची रोजगार निर्मिती झाली होती. जून महिन्यात ही संख्या २ कोटी ३१ लाख ९५ हजार ५४० मनुष्य दिवसांवर गेली होती. या तुलनेत चालू वर्षात म्हणजे २०२१-२२ मध्ये मे महिन्यात १ कोटी ३९ लाख २५ हजार २०९ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली, तर जून महिन्यात ही संख्या २ कोटी १५ लाख १७ हजार ५८० इतकी होती. जुलै महिन्यात या संख्येत पुन्हा वाढ होत ती २ कोटी ६२ लाख ८ हजार ९६९ मनुष्य दिवस झाली.दुसऱ्या लाटेदरम्यान करोनावर लस उपलब्ध झाली. निर्बंधातही शिथिलता आली. मजूर पुन्हा काही प्रमाणात शहराकडे वळले. योजनेवर काम करणारे कंत्राटी तसेच इतर कर्मचारीही मोठ्या संख्येने बाधित झाले. या सर्वांचा परिणाम रोजगाराच्या मागणीत घट होण्यात झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मे, जून महिन्यात प्रतिमनुष्य दिवस रोजगार निर्मिती किंचित कमी झाली, असे मनरेगाचे अधिकारी सांगतात. असे असले तरी करोनाच्या संकट काळात गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यात मनरेगाने सातत्य राखले हे जुलै महिन्यातील रोजगार दिवसात झालेल्या वाढीतून दिसून येते. यासंदर्भात मनरेगाचे आयुक्त सुधांशू गोयल म्हणाले, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही टाळेबंदी होती. त्यामुळे तेथे मजूर कामावर जाऊ शकत नव्हते, विशेषत: विदर्भात आणि मराठवाड्यात साथ जोरात होती. याही परिस्थितीत जेथे जेथे शक्य होईल तेथे मनरेगाची कामे सुरू करण्यात आली. जुलै महिन्यात स्थिती पूर्वपदावर आल्यावर पूर्णक्षमतेने काम सुरू झाले.

‘‘संपूर्ण राज्याचा विचार केला असता सरासरी मजुरांची संख्या वाढली आहे. एप्रिल-मे महिन्यात करोनाची साथ शिखरावर असताना मनरेगाचे कंत्राटी व इतर कर्मचारी बाधित झाले होते. राज्यात त्यांची संख्या सुमारे १२५ हून अधिक होती. राज्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसाचाही परिणाम झाला. सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात ही कामे सुरू आहेत.’’- सुधांशू गोयल, आयुक्त, मनरेगा