वन्यजीव अभ्यासक डॉ. जेरील बानाईत यांचा सवाल

वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबीयाप्रमाणे वन्यजीवप्रेमींसाठीसुद्धा तेवढीच दु:खाची गोष्ट आहे, पण म्हणून वाघाला नरभक्षक ठरवणे हे कितपत योग्य आहे? ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातून बोर व्याघ्रप्रकल्पात सोडलेल्या वाघिणीने माणसांवर हल्ला केला म्हणून लगेच तिला नरभक्षक घोषित करणाऱ्यांमध्ये वनखातेही सामील झाले हे आश्चर्य आहे. ती वाघीण नुकतीच वयात आलेली होती. या वयात माणसांच्या ‘हार्मोन्स’मध्ये ज्याप्रमाणे बदल होतात आणि त्याच्या स्वभाव व कृतीत बदल होतात. तीच गोष्ट वाघिणीबाबतही घडली. यादरम्यान तिने माणसांवर केलेले हल्ले फक्त आणि फक्त ‘चान्स एन्काउंटर’ या गटात मोडणारे आहेत.

वाघिणीला सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा रद्द व्हावी म्हणून अखेपर्यंत याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात भूमिका मांडणारे वन्यजीव अभ्यासक डॉ. जेरील बानाईत यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या भेटीत या संपूर्ण प्रकरणाचे कांगोरे उलगडून दाखवले. वाघाने किंवा वाघिणीने माणसांवर हल्ले केले म्हणून त्याच्यासाठी थेट मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाणे चुकीचे आहे. शेकडोंचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यालासुद्धा अखेपर्यंत आजीवन कारावास शिक्षेसाठी प्रयत्न केले जातात. मग वाघ तर निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. एका वाघिणीची जननक्षमता १५ ते १६ बछडय़ांना जन्म देण्याची आहे. अशा परिस्थितीत तिला मारणे म्हणजे १५ ते १६ वाघांचा बळी घेणे नाही का? वाघिणीला मारून गेलेल्या माणसांचा जीव परत येणार नाही. त्याच्या वर्तणुकीमुळे मानवी मृत्यू होत असतील तर त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले जाऊ शकते.

अगदी दीड वर्षांचा असतानापासून मी वन्यजीव आणि जंगल जवळून अनुभवतोय. दिवंगत माधवराव पाटील डोंगरवारांनी वन्यजीव आणि जंगलाच्या संवर्धनाचे धडे मला दिले आहेत. वडील डॉ. अविनाश बानाईत यांचे बोट पकडून मी वन्यजीवांच्या जगात पाऊल टाकले आणि त्या अनुभवातून हे सांगू शकतो की, वाघ हा कधीच नरभक्षक असत नाही. मुळात नरभक्षकाची व्याख्या काय? राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या निकषात हे सर्व दिलेले आहे. यात वाघाचे त्या परिसरातील पाऊलखुणा, केस, तसेच डीएनए चाचणी केली जाते. त्याच्या शरीरात मानवी अंश आढळला तरच तो वाघ नरभक्षकाच्या गटात मोडला जाऊ शकतो. या निकषांचे पालन न करता येथे सरळसोटपणे वनखात्याने कागदोपत्री वाघ नरभक्षक असण्यावर शिक्कामोर्तब केले. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील वाघीण नरभक्षक नव्हती. वयात आलेले मूल ज्याप्रमाणे एकटे राहून काही करू पाहते, तसेच ही वाघीणसुद्धा वयात आल्यानंतर शिकारीचा सरावच करत होती. या क्षेत्रात तिने दोन माणसांचा बळी घेतला आणि तिला जेरबंद करून बोरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात दोन माणसे वाघाच्या हल्ल्यात मारली गेली. त्यामुळे आधी मृत पावलेल्या वाघांना याच वाघिणीने मारले हे वनखाते कशावरून सिद्ध करणार? या वाघिणीवर तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण शेवटी उपयोग काय झाला? तिच्या ‘रेडिओ कॉलर’ वर लाखो रुपये खर्च, तिला मारण्यासाठी बोलावलेल्या शिकाऱ्यावर खर्च, तिला बेशुद्ध करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञांवर खर्च करण्यात आला. त्यापेक्षा वनखात्याची यंत्रणा सज्ज असती तर, ही कोटय़वधीची उधळपट्टी करावी लागली नसती. याठिकाणी उधळपट्टी तर झालीच, पण वाघीणसुद्धा हातची गेली.

समितीत जीवशास्त्रज्ञाचा समावेश नाही

‘त्या’ वाघिणीला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातून जेरबंद केल्यानंतर दुसऱ्या वनपरिक्षेत्रात सोडण्याचा निर्णय योग्य होता, पण त्यासाठी जी समिती गठित केली होती, त्या समितीत जीवशास्त्रज्ञाचाही समावेश असायला हवा होता. कारण ज्या वनक्षेत्रातून तिला जेरबंद केले, त्या वनक्षेत्रालगत मोठय़ा प्रमाणावर गावे होती. ज्याठिकाणी बोर अभयारण्यातील नवरगाव वनक्षेत्रात तिला सोडले, तेथेही तीच परिस्थिती होती. त्यामुळे ब्रम्हपुरीसारख्याच प्रकाराची पुनरावृत्ती होणार हे निश्चित होते. समितीत जीवशास्त्रज्ञाचाही समावेश असता तर कदाचित वाघिणीची मानसिकता लक्षात घेऊन तिच्या सुटकेसाठी दुसरे वनक्षेत्र निवडण्यात आले असते.

ही तर वनखात्याची नामुष्की

महसूल खात्यानंतर सर्वाधिक मनुष्यबळ वनखात्यात आहे. अशावेळी वनखात्याला वाघाला बेशुद्ध करण्यासाठी बाहेरच्या माणसांना बोलवावे लागणे हे वनखात्याचे अपयश आहे. वनखात्यात आणि विशेषकरून वन्यजीव विभागात नोकरीला लागलेल्या प्रत्येकाला नोकरीत रुजू होताना या सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. असे असताना वाघाला बेशुद्ध करण्यासाठी पैसे देऊन भाडोत्री तत्त्वावर बाहेरच्या माणसाला बोलवावे लागणे ही वनखात्याची नामुष्की आहे. मान्य आहे की वाघाने जास्त धुमाकूळ घातला तर त्याला ठार करण्याची तरतूद वनकायद्यात आहे, पण त्यासाठी भाडोत्री ‘शुटर’ला ते देखील शिकाऱ्याला बोलावणे हे अतिशय लाजिरवाणे आहे. मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला आहे आणि अशावेळी वनखात्याची संपूर्ण यंत्रणा प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज असायला हवी. बेशुद्धीकरण तज्ज्ञांपासून तर शुटपर्यंत हे वनखात्यातीलच अधिकारी, कर्मचारी असावेत.

वाघिणीचा मृत्यू चटका लावणारा

एवढी धावपळ करूनही वाघिणीला वाचवता आले नाही, याचे दु:ख आहे. या प्रकरणात वाघिणीला वाचवण्यासाठी एक-एक क्षण महत्त्वाचा होता. वनखात्याची भूमिका वारंवार बदलत होती, त्यामुळे आणखी अडचणी येत होत्या. त्यातूनही पहिल्यांदा जेव्हा तिच्या मृत्युदंडावरचे सावट उठले तेव्हा समाधानाचा सुस्कारा सोडला, पण नंतर तिच्या मृत्युदंडावर शिक्कामोर्तब झाले तेव्हा आशेचा एक किरण बाकी होता. म्हणूनच रात्रीतून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली. सर्व कागदपत्रे गोळा करून विमानतळाच्या दिशेने रवाना झालो आणि वडील डॉ. अविनाश बानाईत यांचा फोन आला. वाघिणीचा या पद्धतीने झालेला मृत्यू चटका लावणारा होता, पण पुढे वन्यजीवांबाबत अशा घटना होऊ नयेत म्हणून कायम लढत राहणार.