अनिल कांबळे
नागपूर : राज्यात कारागृहातील कैदांकडून पैसे घेऊन त्यांना मोबाईलसह इतर सुखसुविधा पुरवल्या जात असून फोनवर बोलण्यासाठी कैद्याकडून १०० रुपये प्रतिमिनिट रक्कम वसूल केली जात असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यात एक रॅकेट सक्रिय असून त्यात तुरुंग अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचाही दावा केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक कारागृहात कैद्यांना सुविधा पुरवण्याचे वेगवेगळे दर ठरलेले आहेत. त्यातही नागपूर कारागृहातील दर नेहमी चढे असतात. २०१८ मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या बराकीची झडती घेतली असता तेथे भ्रमणध्वनी संच, गांजा, चिलीम, अंमली पदार्थासह दारू आणि शस्त्रसुद्धा सापडली होती. नागपूर कारागृहात कैद्याकडून प्रतिमिनिट १०० रुपये दर मोबाईलवर बोलण्याचा आकारला जाते. तर गांजाची पुडी १००० रुपये आणि जेवणाला तडका मारण्यासाठी १०० रुपये घेण्यात येत असल्याची माहिती कारागृहाशी जुळलेल्या एका विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कैद्यांकडे येणाऱ्या या सुखचैनीच्या वस्तू कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय येणे शक्य नसल्याने येथे एक रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जाते.
न्यायालयात नेताना आर्थिक व्यवहार
कारागृहातील कैद्यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर करावे लागते. कारागृह ते न्यायालया दरम्यान रस्त्यात कैद्याला बाहेर ह़ॉटेलमधील पदार्थ खाऊ देण्यासाठी नातेवाईकांकडून पोलीस पैसे घेतात. एवढेच नव्हे तर न्यायालयातून परत कारागृहात नेताना चक्क दारूसुद्धा कैद्याला पुरवण्यात येते. काही दिवसांपूर्वीच पुण्यात कृष्णा मारने नावाच्या कैद्याला दारू पुरवल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. हे येथे उल्लेखनीय.
कोल्हापूर-नागपूर कारागृह चर्चेत
नाशिक, कोल्हापूर-कळंबा, नागपूर, येरवडा, मुंबई, औरंगाबाद या कारागृहात आतापर्यंत कैद्यांना गांजा, ड्रग्ससह मोबाईल पुरवण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हेसुद्धा दाखल झाले असून काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील कळंबा कारागृहातून पाऊण किलो गांजा, १० मोबाईल, २ पेनड्राईव्ह, ५ चार्जिग कॉड जप्त करण्यात आले होते. नागपुरातील कारागृह लिपिक विक्रम गिर याच्या बॅगेत गांजा सापडला होता. तो कैद्यांना १००० रुपये प्रमाणे विकत होता. कोल्हापूरमधील कारागृह कर्मचारी किसन याच्या मोज्यातून कैद्यांपर्यंत चिठ्ठी पोहचवण्याचे काम करीत होता. महिनाभर निरोप पोहचवण्यासाठी २५ हजार रुपये किसनला मिळत होते.

प्रवेशद्वार ते बराकी यामध्ये अंतर
राज्यातील अनेक कारागृहातील मुख्य प्रवेशद्वार ते थेट कैद्यांच्या बराकीमध्ये जवळपास १० ते १५ मिनिटांचे अंतर असते. तसेच बाहेरच्या अधिकाऱ्याला आतमध्ये सोडण्यापूर्वी सुरक्षेच्या नावावर थांबवण्यात येते. एवढय़ा वेळात कारागृहात काही गडबड असल्यास परिस्थिती सावरली जाते.

‘‘कारागृहात असे प्रकार घडत असतील तर त्याचा तपास करू, त्यात कारागृहातील कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आढळून आल्यास कडक कारवाई करू.’’-स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक