प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेतील विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सुरुवात केली. पाककला आणि पाकशास्त्र या दोन्ही तंत्राचा उपयोग करून त्यांनी दिवसभरात १६० हून अधिक पदार्थ पहिल्या दिवशी तयार केले.
उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात विष्णू मनोहर यांच्या ५२ तासांच्या विश्वविक्रमाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यासाठी स्वतंत्र पाकगृह तयार करण्यात आले आहे. विष्णू यांनी प्रथम रव्याचा शिरा आणि मोदक तयार केले. पहिल्या एक तासात २० पदार्थ तयार झाले. दिवसभरात ही संख्या १६० वर गेली. त्यात शिरा, मोदक, विविध प्रकारचे सूप, चिवडय़ांचे विविध प्रकार चकल्यांचे विविध प्रकार यासह ग्रीन टी, हर्बल टी, जिंगर टी, मुगाची शेव, रव्याची शेव आदींचा समावेश आहे. या सर्व प्रक्रियेची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची चमू घेत आहे.
कुकिंग मॅरेथॉनचा गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमधील याआधीचा ४० तासांचा विक्रम २०१४ मध्ये अमेरिकेतील एम. बेंजामिन जे पेरी यांच्या नावावर असून तो शनिवारी रात्री ११ वाजता पूर्ण होईल. त्यानंतर विष्णू स्वत:चा ५२ तासांचा विक्रम करणार आहे. यासाठी त्यांनी विविध पदार्थ तयार करण्याचे नियोजन केले आहे. एकापाठोपाठ एक असे चविष्ट पदार्थ तयार करून ते उपस्थितांच्या आस्वादासाठी ठेवले जात आहे. या संपूर्ण विक्रमाच्या चित्रीकरणाची जबाबदारी राजेश फुफाला सांभाळत असून मैत्री परिसवाराचे अध्यक्ष संजय भेंडे आणि चंदू पेंडके यांच्या नेतृत्वाखाली १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते वेगवेगळ्या व्यवस्थेतवर काम करीत आहे. विष्णू मनोहर यांचा खाद्यपदार्थाचा विक्रम पाहण्यासाठी दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, सकाळी अंजनगाव सुर्जीचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी, ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी विष्णू मनोहर यांना त्यांच्या उपक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या.