रणरणत्या उन्हात ती सारीच चिमुकली एकवटली होती. कायम आपल्यासोबत असलेली सावली कशी गायब होते, हे त्यांना देखील बघायचे होते. सुरुवातीला गर्द, मोठी वाटणारी सावली हळूहळू कमी कमी होऊ लागली, तशीतशी त्यांची उत्कंठा आणखी वाढत गेली. शेवटी तो क्षण आला आणि छोटीशी दिसणारी सावली पूर्णपणे नाहीशी झाली. उत्कंठा, आश्चर्य आणि आनंद असे सारेच भाव या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर होते. रामन विज्ञान केंद्राने त्यांना हा क्षण अनुभवण्याची संधी दिली. एवढेच नव्हे तर क्षणाक्षणाला ही प्रक्रियासुद्धा समजावून सांगितली.
२५ मे पासून नवतपा सुरू झाला आणि रणरणत्या उन्हात चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांनीसुद्धा शून्य सावली दिवस अनुभवला. अधूनमधून ढगाळ वातावरण डोकावत असल्याने हा क्षण अनुभवण्याची संधी हातातून जाते की काय, असेही वाटून गेले. मात्र, १२ वाजून ९ मिनिटांनी सावली पूर्णच नाहीशी झाली. दरम्यान, कुणी आपलीच सावली चाचपडून पाहण्याचा प्रयत्न केला, तर कुणी हाती येईल ती वस्तू जमिनीवर ठेवून हा प्रयोग करून पाहिला. रामन विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह त्यामागील विज्ञान उलगडून दाखवले. वर्षांनुवर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असली तरीही अलीकडच्या काही वर्षांत शून्य सावली दिवसाविषयी अधिक जनजागृती झाली आहे. म्हणूनच की काय आज रस्त्यांनीही अनेकजण आपल्यासमोरील वाहनांची, दुचाकीस्वारांची सावली कशी कमी झाली याविषयी बोलतही होते आणि अनुभवतसुद्धा होते.
दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सूर्य डोक्यावर आला आणि सावली अगदी पायाशी येऊन अदृश्य झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. रामन विज्ञान केंद्रात चिमुकल्यांसोबत त्यांच्या पालकांनीसुद्धा हा अनुभव घेतला. कुणी साथ दिली काय किंवा नाही काय, पण माणसाची सावली मात्र कायम त्याच्यासोबत असते. मात्र, वर्षांतून दोनदा सावलीही साथ सोडते आणि हेच आज नागपूरकरांनी अनुभवले.
येत्या १७ जुलैला पुन्हा त्यांना हा क्षण अनुभवता येणार आहे. मात्र, पावसाळ्याचे दिवस असल्याने जुलै महिन्यातील ही संधी फार क्वचितच अनुभवायला मिळते.
त्यामुळेच आज रामन विज्ञान केंद्रात अनेक नागपूरकरांनी हा क्षण अनुभवला.
माणसाची सावली अदृश्य होण्याच्या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते आणि वर्षांतून दोनदा हा दिवस अनुभवता येतो. माणसाची सावली पाठ सोडत नसली तरीही निसर्ग आणि भौगोलिक घडामोडींमुळे सावली अगदी पायाशी येते. त्यामुळे ती दिसत नाही. पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. दररोज सूर्योदय किंवा सूर्यास्ताची जागा बदलत असते. सुमारे २३ डिसेंबर ते २१ जून दरम्यान सूर्याचे उत्तरायन असते आणि त्यानंतर दक्षिणायन. यादरम्यान दोन दिवस मध्यान्हाच्यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्यावेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते.