बुलढाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसर आणि चिखली तालुक्यातील पांढरदेव  गावात  ९ ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश  पाऊस झाला.  साखरखेरड्यात सिद्धेश्वर मंदिर बुडाले. शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.साखरखेर्डा परिसरात सोयाबीन, कपाशी, हळद  अक्षरशः पाण्याखाली गेल्याने शेतकरी हैराण झाला आहे.आठवडाभराची उसंत घेऊन  पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे. भोगावती नदीकाठी असलेल्या सर्व शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले असून  शेतकरी हवालदिल झाले आहेत.   रक्षाबंधनाला होणारी कुस्त्यांची दंगलही स्थगित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.शेतांमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे.

साखरखेर्डा येथील भोगावती नदीच्या तिरावर असलेले महाकलेश्वर मंदिराला पाणी लागले तर सवडद फाट्यावरील प्रवासी निवारा, सिध्देश्वर मंदिर पाण्यात बुडाले आहे. आमखेड येथील धरण पूर्णतः भरले असून धरणाखालील गावांना ठाणेदार गजानन करेवाड यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सवडदचा पुलावर पणी आल्याने पाच तास हा मार्ग बंद होता. यामुळे शेकडो शाळकरी विद्यार्थांचे  हाल झाले. अतिवृष्टीमुळे कोराडी, भोगावती नदीकाठची पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी सवडदचे सरपंच गजानन देशमुख यांनी केली आहे.

चिखली तालुक्यातील पांढरदेव येथे  दुपारी मोठ्या प्रमाणात  पावसाने हजेरी लावली.   मुसळधार पावसाने  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावकऱ्यांच्या घरात पाच ते सात फूट इतके पाणी साचले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पांढरदेव  ग्रामस्थांनी केली आहे.

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च करून सोयाबीन , कापूस , तूर, उडीद, मुंग या पिकांची लागवड केली आहे. मात्र  पेरणीनंतर  दोन महिन्याचा कालावधी होत नाही तर पांढरदेव येथे  शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच  घरांचे, रस्त्यांचे आणि जनावरांचीही प्रचंड हानी झाली आहे. यामुळे ग्रामस्थ आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.   तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य  भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.