गोरगरिब जनतेसाठी लवकरच शिवभोजन योजना सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली.

सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्गावरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला आहे. उद्धव ठाकरे सातबारा कोरा करणार म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंत कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्यापूर्वी बोलताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच कोणत्याही सिचन प्रकल्पाला आपण स्थिगिती दिली नाही. सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेताना कालव्यांचीही दुरूस्ती करण्यात येणार आहेत. तसंच गोसेखुर्द प्रकल्पासाठी लागेल तेवढा पैसाही राज्य सरकार देईल, असंही त्यांनी नमूद केलं. प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारलं जाणार आहे. राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसंच जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० रूपये अधिक देण्यात येतील. पूर्ण विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष निधीची घोषणाही केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मदत करण्याची विनंती केली. मोदी मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात मग महाराष्ट्राला का देत नाहीत?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी हे जागतिक दर्जाचे नेते आहेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.