राज्यातील उच्च शिक्षण संस्था टप्प्याटप्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी झालेल्या कुलगुरूंच्या बैठकीत दिली. विशेष म्हणजे, सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरचित्राद्वारे संवाद साधला. या वेळी कुलगुरूंनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली असता त्यांनी ही माहिती दिली. सर्वच स्तरांतून वाढता दबाव बघता उदय सामंत यांनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना सुरुवातीला ५० टक्के उपस्थिती ठेवणे अपेक्षित असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यास मज्जाव करू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय वसतिगृह बंद असल्याने बाहेर शहरात असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात येण्यासाठी कुठलेही बंधन टाकू नयेत, अशा सूचना या वेळी सामंत यांनी दिल्या.

‘परीक्षांचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा’

विद्यापीठांच्या शैक्षणिक वर्षांला जुलैपासून सुरुवात झाली असून तिसऱ्या, पाचव्या व सातव्या सत्रांच्या परीक्षांचा अभ्यासक्रमही पूर्ण झाला आहे. त्यामुळे या परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, त्या ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी घेण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही उदय सामंत यांनी या बैठकीत दिल्या.