युवक काँग्रेसच्या मोर्चात गट तट विसरून सर्व नेत्यांचा सहभाग
नागपूर : जनतेला महागाईच्या दरीत लोटणाऱ्या आणि लोकांवर पाळत ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने सोमवारी संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसच्या गटातटात विभागलेल्या सर्व नेत्यांनी हजेरी लावून एकजुटीचे प्रदर्शन घडवले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दोन आठडय़ापूर्वी सायकल रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी आणि तीन दिवसांपूर्वी पटोले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित नव्हते. राऊत यांच्याकडून प्रकृतीचे आणि व्यवस्थेचे कारण देण्यातआले होते.

तरीही बैठकीत काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणावर चर्चा झाली होती. सोमवारी युवक काँग्रेसच्या मोर्चात मात्र, शहरातील सर्वच गटातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते. केंद्राच्या जनविरोधी धोरणामुळे महागाई गगनाला भिडली आहे. चुकीच्या कृषी कायद्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत. तर देशातील राजकीय पुढारी, न्यायमूर्ती, पत्रकार आणि निवडक उद्योजकांचे फोन रेकॉर्ड करून त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे लोकशाही विरोधी काम मोदी सरकार करत आहे. त्याविरोधात युवक काँग्रेसने सोमवारी नागपुरात मोर्चा काढला.

या मोर्चात नागपूर जिल्ह्यचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्यासह हजारो युवकांनी सहभाग घेतला. यावेळी संविधान चौकात गोळा झालेल्या युवकांसमोर अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले. पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत व माजी मंत्री अनीस अहमद आदींनी युवकांना मार्गदर्शन केले.

मोदी सरकारच्या विरोधातील घोषणांनी सर्व परिसर युवकांनी दणाणून सोडला. या मोर्चामुळे संविधान चौक ते जीपीओ चौकापर्यंत मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखली होती. संविधान चौकात शहरातील विविध भागातून युवकांचे जत्थे गोळा झाले होते. या युवकांच्या हातात मोदी सरकारच्या विरोधात फलक व युवक काँग्रेसचे झेंडे होते.  मोर्चात युवतींचा सहभाग मोठा होता.

संविधान चौकापासून युवकांनी हातात फलक घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात डॉ.  राऊत, आमदार ठाकरे सामील झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयात आल्यानंतर युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांना मागण्यांचे निवेदन दिले.