मंत्र्यांची थेट सोनिया गांधींकडे तक्रार
नागपूर : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी वाईट वागणूक देत असल्याची तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे नवी दिल्लीत केली आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील विविध विषयावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीमधील काँग्रेस मंत्र्यांना दिल्लीत शनिवारी बोलावून घेतले होते. यावेळी झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे वरील तक्रार केली. यावर दिल्लीतील काही नेत्यांनी काँग्रेसने अधिक खंबीर भूमिका घ्यायला हवी, अशी सूचना केली. बैठकीत प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा झाली. थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आणि महसूल मंत्रीपद आहे. राज्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी नवीन अध्यक्ष निवडण्याची गरज आहे. प्रदेशाध्यक्ष निवड प्रक्रियेला गती द्यावी, असेही काही मंत्री म्हणाले. थोरात यांनी आपण तर स्वत: पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या पदाच्या दावेदारात आघाडीवर आहेत.
दरम्यान, एका मंत्र्यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीचा विषय मांडला. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला अर्थसंकल्पीय तरतुदीला कात्री लावण्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार केला जात आहे. काँग्रेसच्या मंत्र्याच्या विभागाला पुरेशी तरतूद मिळेल. यासाठी प्रयत्न करणे थोरात यांची जबाबदारी आहे, असेही या वरिष्ठ मंत्र्यांचे म्हणणे होते.
‘पक्षश्रेष्ठींच्या सूचना गांभीर्याने घ्या’
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी १४ डिसेंबर २०२० मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी दलित आणि आदिवासी यांच्यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला होता. थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या सूचनांची अंमलबजाणी व्हावी, यासाठी आग्रही असले पाहिजे, असे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील या बैठकीत म्हणाले.