काँग्रेसच्या खासदाराचा रेल्वेमंत्र्यांना सवाल

नागपूर : रेल्वे मंत्रालयाने कोविडमध्ये विशेष रेल्वेगाड्या सरू केल्या. त्यांचे नियमित रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक भाडे आकारले जात आहे. आता करोना कमी झाला असला तरी विशेष गाड्या चालवून रेल्वेने सामान्य प्रवाशांची लूट सुरूच ठेवली आहे. ही लूट केव्हापर्यंत चालणार, असा सवाल काँग्रेसचे खासदार  बाळू धानोरकर यांनी रेल्वेमंत्र्यांना केला आहे. 

केंद्र सरकारने टाळेबंदी शिथिल झाल्याने रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली. परंतु रेल्वेने प्रारंभी कोविड स्पेशल आणि नंतर विशेषगाड्या सुरू केल्यात. टाळेबंदीआधी ज्या रेल्वे धावत होत्या, त्यांच्या वेळवर अनेक विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोकर यांना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार लुटारूंचे  सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांशी काही देणघेणे नाही. लोकांवर आर्थिक भुर्दंड लावून त्यांची अवहेलना करणे आणि मूठभर लोकांसाठी सरकार चालवणे हे एकमेव धोरण केंद्रातील भाजप सरकारचे आहे, असा गंभीर आरोपही त्यांना केला. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कोविडच्या नावाखाली वाढलेले रेल्वेचे तिकीट दर कमी करण्यात यावेत. नियमित रेल्वे सुरू करण्यात याव्या आणि ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोग रुग्णांच्या प्रवासभाड्यातील सवलती तातडीने पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारने विमान वाहतूक कंपन्यांना १०० टक्के प्रवासी वाहून नेण्याची परवानगी दिली. याचाच अर्थ करोनाचा धोका नाही. तर मग विशेष रेल्वेगाड्या बंद करून नियमित रेल्वेगाड्या  (रेग्युलर)सुरू केल्या जात नाही. ज्या रेल्वेने सर्वसामान्य लोक  प्रवास करतात. त्या गाड्यांना विशेष गाड्याचा दर्जा द्यायचा आणि प्रवाशांची लूट करण्याचा धंदा रेल्वेने सुरू केला आहे. हे सर्व सामान्य लोकांचे सरकार नाही, अशी टीकाही धानोरकर यांनी लोकसत्ताशी बोलताना केली.