२०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर देऊन काँग्रेसची प्रतिमा उजळण्याचे काम काँग्रेस समाज माध्यम विभागाने हाती घेतले आहे. समाज माध्यम विभाग अधिक आक्रमक करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेश समाजमाध्यम विभाग प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी दिली.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबीर नागपुरात होत आहे. यामध्ये भाजपच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासोबत काँग्रेसच्या सकारात्मक बाबी जनतेसमोर मांडल्या जाणार आहे. भाजपच्या आयटी सेलमध्ये शेकडो कर्मचारी आहेत. त्यावर भाजप कोट्यवधी रुपये खर्च करते. समाजमाध्यमात हतखंडा असलेल्या कंपन्या त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार अधिक आक्रमक दिसून येतो, असे मुत्तेमवार म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या समाज माध्यम विभागाच्या वतीने २८ व २९ मे रोजी दोन दिवसीय राज्य व राष्ट्रीय सोशल मीडिया नव संकल्प शिबीर नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. २८ मे रोजी वनामती सभागृहात आयोजित शिबिरात स्थानिक आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग राज्य कार्यकारिणी पदाधिकारी सहभागी होतील. २९ मे रोजी वाडी-हिंगणा रोडवरील सॉलीटिअर बँकेट हॉलमध्ये आयोजित शिबिरात देशभरातील तीस राज्यातून काँग्रेस सोशल मीडियाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. शिबिरात आगामी निवडणुकांची रणनीती, भाजपच्या दुष्प्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर आणि जनजागरणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.