नागपूर : राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असून हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना ढगाळ वातावरण आहे. आठ मेपासून उपराजधानीसह विदर्भातील काही शहरात पुन्हा तापमानाचा उच्चांक नोंदवला जाईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. मात्र, उपराजधानीत उन्हाचे चटके आणि ढगांचे आच्छादन अशी दुहेरी स्थिती आहे.
हवामान खात्याने आता पुन्हा ९ ते १२ मे दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे या शहरांमध्ये कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या संपूर्ण आठवडय़ात ढगाळ वातावरणाचाही अंदाज आहे. राजस्थानमध्ये १२ मे पर्यंत उष्णतेच्या लाटा तर दक्षिण हरियाणा-दिल्ली आणि दक्षिण पंजाबमध्येदेखील दहा ते १२ मे दरम्यान उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी विदर्भातील काही शहरांमध्ये तसेच पश्चिम मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने हा अंदाज दिला असला तरीही पुढचे काही दिवस ढगाळ वातावरणदेखील राहू शकते. ढग, वादळ आणि पावसाची जी स्थिती साधारणपणे जून महिन्याच्या अखेरीस तयार होते, ती आताच दिसून येत असल्याने हा आठवडा ऊन आणि पावसाचा असू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. नवतपा येण्याआधीच १५ ते २२ मे च्या दरम्यान उष्णतेची मोठी लाट विदर्भात येऊ शकते. म्हणजेच हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेसह तापमानाच्या उच्चांकाचा जो इशारा दिला होता, तो १५ ते २२ मे या कालावधीत प्रत्यक्षात उतरू शकतो.