लसीकरणासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा; सुविधांचा अभाव, असमन्वयाचा फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : महापालिके च्या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे हाल अद्यापही सुरूच आहेत. पुरेशा सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि प्रशासन व पदाधिकारी यांच्यात नसलेला समन्वय याचा फटका या ज्येष्ठ नागरिकांना बसत असून  लसीकरणासाठी तब्बल पाच ते सहा तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन नोंदणी करणाऱ्यांना प्रथम लस दिली जात असल्याने नाराजी व्यक्त के ली जात आहे. ऑफलाईनच नोंदणी करायची होती तर ऑनलाईनचा आग्रह कशासाठी के ला, असा सवाल के ला जात आहे. पाच ते सहा तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. नोंदणीसाठी  एकाच खिडकी आहे. एका व्यक्तीला नोंदणीसाठी किमान दहा मिनिटे लागतात. त्यामुळे रांग वाढतच जाते. कर्मचारी नाही, डॉक्टरही एकच, परिचारिकांची संख्याही कमी आहे.

के ंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पण ग्लास नाही. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी  फक्त एकच सुरक्षा रक्षक आहे. अभ्यंकर नगरातील सत्तर वर्षीय एका महिलेने २ मार्चला ऑनलाईन नोंदणी केली. त्या बुधवारी लस घेण्यासाठी आल्या असता त्यांना उद्या या, असे सांगून परत पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गेल्या असता त्यांची निराशाच झाली.

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया

रुग्णालयाने गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना  वेळेचे टोकन द्यावे, त्यानुसार ते के ंद्रावर येतील. यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी  लागणार नाही. आता त्यांना तासन्तास वाट बघावी लागते.

ते योग्य नाही. नोंदणी खिडकी आणि लसीकरण बुथची संख्या वाढवावी,  कर्मचारी नसतील तर खाजगी रुग्णालयाची मदत घ्यावी.

– मारोतराव देशमुख. 

सकाळी १० वाजता रुग्णालयात आली.  दुपारी एक  वाजला तरी लस मिळाली नाही.

– सुरेखा ठाकरे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करणारे एकाचवेळी येत असल्यामुळे पहिल्या दिवशी व्यवस्था कोलमडली होती.  आता व्यवस्था केली जात आहे. या संदर्भात रुग्णालयालयातील अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. झोन पातळीवर नोंदणी केली जात असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी करू नये.

– डॉ. नरेंद्र बहीरवार वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

झोन कार्यालयात ऑनलाइन नोंदणी

करोना लसीकरणासाठी होणारी गर्दी आणि नागरिकांची गैरसोय पाहता महापालिकेच्या झोन कार्यालयातून ऑनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. दहाही झोन कार्यालयांमध्ये दुपारी १२ वाजतापासून नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली. ती पुढेही नियमित सुरू राहणार आहे. उद्या शुक्रवारपासून रविवार वगळता दररोज सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत लसीकणासाठी ऑनलाईन नोंदणी केली जाईल.

ज्यांना स्वत: घरून लसीकरणासाठी नोंदणी करणे शक्य आहे, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नाही, अशांसाठी महापालिकेतर्फे विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. लसीकरण प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी यासाठी महापौरांनी हा निर्णय घेतला आहे.

जैविक कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई

सीताबर्डीवरील एस.आर. लिमिटेड लॅबचे डॉ. निरंजन नायक यांनी बायो-मेडिकल कचरा सामान्य कचऱ्यासोबत अनधिकृत ठिकाणी टाकल्यामुळे त्यांना एक लाखाचा दंड आकारण्यात आला. जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियमावली तयार केली आहे. मात्र अनेक रुग्णालये आपला जैविक कचरा रस्त्यावर किंवा कचरा घरात टाकत असल्याच्या तक्रारी महापालिकेला मिळाल्याने उपद्रवी शोध पथकाने शोध घेत त्यावर कारवाई सुरू केली आहे.

मद्यालये, दुकानांना दंड

महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाद्वारे गुरुवारी पायल वाईन शॉप खरबी रोड, सनशाईन शुज बडकस चौक, रॉयल ट्रेडिंग बडकस चौक महाल, उमाशंकर ठाकरे विजय नगर, एस अ‍ॅन्ड एस स्टडी सर्कल वैशाली नगर, कासा रॉयल अपार्टमेंट मोहननगर या ठिकाणी कारवाई करत १ लाख ४५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय ११२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली आहे.

करोनाग्रस्त आढळल्याने लग्नाचा मुहूर्त हुकला!

लग्नाचे स्वप्न घेऊन दुबईहून एक तरुण नुकताच नागपुरात परतला. विलगीकरण केंद्रातील चाचणीत त्याला करोनाचे निदान झाले.

त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. त्याचे ५ मार्चला जबलपूरला लग्न ठरले होते. परंतु करोनामुळे आता त्याच्या लग्नाचा मुहूर्तच हुकला. स्वप्निल (बदललेले नाव) असे २३ वर्षीय बाधित तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जबलपूर, मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. सध्या तो नोकरीनिमित्त दुबईला असतो. स्वप्निल लग्नासाठी नागपुरात आला.  नियमानुसार    त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता  त्याला करोना असल्याचे निदान झाले. त्याला  मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. तो रुग्णालयात अडकल्याने त्याचे ५ मार्चचे लग्न  स्थगित झाल्याची माहिती विलगीकरण केंद्रातील एका अधिकाऱ्याने दिली.दरम्यान, विदेश प्रवासाचा इतिहास असल्याने त्याला बाधित करणारा विषाणू  स्ट्रेन तर नाही,  याच्या तपासणीसाठी त्याचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona vaccination elder citizen facing problem dd
First published on: 05-03-2021 at 00:58 IST