२४ तासांत ३० मृत्यू; ७१५ नवीन बाधित

नागपूर : गेल्या २४ तासांत करोनाने ३० मृत्यू झाले असून नवीन ७१५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बधितांची संख्या २१ हजार पार (२१,१५४ रुग्ण) गेली आहे.  महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या १५,९९१ इतकी आहे.

मेयो रुग्णालयात दिवसभरात ८ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यात छावणी (सदर) परिसरातील ५० वर्षीय पुरुष, महाकालीनगर (मानेवाडा) परिसरातील ६८ वर्षीय पुरुष, कामठीतील ५५ वर्षीय पुरुष, कामठीतील ५४ वर्षीय महिला, खरबीतील ५३ वर्षीय महिला, जुनी मंगळवारी परिसरातील ६४ वर्षीय पुरुष, जयभीम नगर (हिवरी नगर) परिसरातील ६६ वर्षीय पुरुष, बडा ताजबाग परिसरातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. मेडिकलमध्येही काही मृत्यू नोंदवले गेले. विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांत नोंदवलेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी २१ मृत्यू शहरी भागातील होते. ग्रामीण भागात ६ आणि नागपूर जिल्ह्याबाहेरील तीन मृत्यूही येथे नोंदवले गेले. नवीन बळींमुळे शहरातील विविध रुग्णालयांत आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या थेट ७६२ वर पोहचली आहे. त्यात नागपूर महापालिका हद्दीतील मृत्यूची संख्या ५६७, ग्रामीणची संख्या १११ तर नागपूर जिल्ह्याबाहेरील येथे उपचाराला आलेल्या ८४ रुग्णांचा समावेश आहे.

नवीन ७१५ बाधितांमध्ये ५८५ रुग्ण शहरातील, १२७ रुग्ण ग्रामीणचे आणि ३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील आजपर्यंत आढळलेल्या बाधितांची संख्या २१ हजार १५४ वर पोहचली आहे. त्यात शहरी भागातील १५ हजार ९९१ रुग्ण, ग्रामीणच्या ४ हजार ८९७ रुग्ण तर जिल्ह्याबाहेरील २६६ रुग्णांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ८,३६० वर

सक्रिय रुग्णांची संख्या आता ८,३६० वर पोहचली आहे. त्यातील सर्वाधिक ६,०४६ रुग्ण महापालिका हद्दीतील, २,३१४ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यात तब्बल ५,६६३ रुग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेत आहेत. शहरातील विविध शासकीय— खासगी रुग्णालयांसह, कोविड केअर सेंटरमध्ये १,९८२ रुग्ण उपचार घेत आहेत.  सोमवारी दुपापर्यंत ७१५ रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

९७९ करोनामुक्तांचा उच्चांक गेल्या २४ तासांत तब्बल

९७९ जण करोनामुक्त झाल्याचा उच्चांक नोंदवण्यात आला. त्यात शहरी भागातील ८९४, ग्रामीण भागातील ८५ जणांचा समावेश आहे. या नवीन करोनामुक्तांमुळे  आजपर्यंतच्या बरे झालेल्यांची संख्या १२ हजार ३२ वर पोहचली आहे. त्यात शहरातील ८ हजार २३४ तर ग्रामीण भागातील ३ हजार ७९८ जणांचा समावेश आहे.